कोरोनामुळे शिक्षण थांबून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आपण खेळू शकत नाही हे लक्षात घेऊन विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण, तसेच शहरांपासून दूरवरील शाळा प्रत्यक्ष सुरु कराव्यात. तसेच दुसरीकडे ऑनलाइन, डिजिटल पद्धत पायलट प्रॉजेक्ट म्हणून तातडीने राबवावी असं सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास मान्यता दिली. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग भरवण्यात येणार नसल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
“ऑनलाइनबाबत पालकांच्या मतांचा विचार करण्यात आलेला आहे. पहिली व दुसरीची मुले लहान असतात, त्यांच्यासाठी ऑनलाइन पर्याय दिला जाणार नाही. इयत्ता तिसरी ते पाचवीच्या मुलांना दररोज १ तास व पुढील वर्गाच्या मुलांना दोन तासांपर्यंत ऑनलाइन, डिजिटल शिक्षण देण्याचे नियोजन आहे,” अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
आणखी वाचा- शाळा सुरू झाली आणि शाळेत कोणी करोना पॉझिटिव्ह आढळल्यास काय?
जावडेकरांशी चर्चा करणार
यावेळी बोलताना मंत्री वर्ष गायकवाड यांनी प्राधान्याने दूरदर्शन आणि आकाशवाणीचा उपयोग करून घेण्याची विनंती केली. माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी आपण यासंदर्भात लगेच बोलून ही माध्यमंदेखील उपलब्ध करून घेतली जातील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.
आणखी वाचा- राज्यात पुढील महिन्यापासून शाळा सुरु, असं असेल प्रत्येक वर्गाचं टाइमटेबल
वर्गांचं नियोजन
रेड झोन मध्ये नसलेल्या नववी , दहावी आणि बारावीच्या शाळा-कॉलेज जुलैपासून, ६ वी ते ८ वीच्या ऑगस्ट पासून, तर तिसरी ते पाचवीच्या सप्टेंबरपासून, पहिली आणि दुसरीचे वर्ग शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने, तसंच ११ वीचे वर्ग पुढील महिन्यात लागणाऱ्या दहावीच्या निकालानंतर सुरु करण्याचे नियोजन आहे. ज्या ठिकाणी शाळा सुरु होणार नाही तिथे टाटा स्काय, जिओ यांच्या मदतीने शिक्षणाचे पायलट प्रोजेक्ट लगेचच सुरु करून त्याचा बारकाईने आढावा घेणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. काही कंपन्यांनी इतर राज्यांत प्रयोग केले आहेत त्याचीही परिणामकारकता तपासावी असंही त्यांनी सांगितलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 15, 2020 4:26 pm