विधानसभा निवडणूक प्रचारात जिल्हय़ाच्या सहाही मतदारसंघांत मंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले. परंतु प्रत्यक्षात मंत्रिमंडळ विस्तारात लातूरला ठेंगा दाखवण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरूर अनंतपाळ येथील सभेत संभाजी पाटील निलंगेकर यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येईल, असे सांगितले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुधाकर भालेराव यांना, राजनाथसिंग यांनी पाशा पटेल यांना, रावसाहेब दानवे यांनी रमेश कराड यांना, तर पंकजा मुंडे यांनी गणेश हाके यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येईल, असे जाहीर केले होते. आमदार भालेराव व संभाजी निलंगेकर या दोघांची नावे मंत्रिपदासाठी चच्रेत होती. मात्र, पुढील विस्ताराची आशा दाखवत या वेळी लातूरला वाटाण्याच्या अक्षता देण्यात आल्या आहेत.
पाशा पटेल यांना मुस्लिम चेहरा म्हणून मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असा त्यांच्या समर्थकांचा अंदाज होता. तोही फोल ठरला. लातूर ग्रामीण मतदारसंघात रमेश कराड यांनी कडवी झुंज दिली होती. गेल्या १० वषार्ंपासून ते भाजपत सक्रिय आहेत. विधान परिषदेत त्यांना स्थान मिळावे, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. नव्याने भाजपत दाखल झालेल्या शैलेश लाहोटी यांनी पहिल्याच निवडणुकीत ७० हजार मतदान घेतले. भाजपने विधान परिषदेत संधी द्यावी, अशी त्यांच्याही समर्थकांची मागणी आहे.