शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव नाही. या प्रकरणाशी संबंधित आरोपींना अटक करण्यात आली असून कोणालाही दया- माया न दाखवता योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे स्पष्टीकरण राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी दिले.

ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यालयाचे नुतनीकरण करण्यात आले असून याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी उद्घाटन केले. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना माथूर यांनी अहमदगनरमधील शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची हत्या व या प्रकरणातील आरोपी आमदारांच्या समर्थकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात केलेली तोडफोड यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, अहमदनगरमधील घटना दुर्दैवी आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयावर सुमारे दोन हजार लोकांचा जमाव आला होता. या जमावावर बळाचा वापर करण्याऐवजी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे, असे त्यांनी सांगितले.

अहमदनगरमधील दुहेरी हत्याकांड हे राजकीय वैमनस्यातून घडल्याचे प्रथमदर्शनी दिसते. हत्या प्रकरणाशी संबंधितांना अटक करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. या हत्याकांडातील आरोपींमध्ये तीन आमदार असल्याने राजकीय दबाव आहे का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी राजकीय दबाव नाही, असे स्पष्ट केले. इथे गुन्हेगारीचा प्रश्न आहे. हत्या झालेली असल्याने दबावाचा प्रश्नच येत नाही. हत्या प्रकरणातील आरोपींना अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत. तर एका पोलीस निरीक्षकालाही निलंबित करण्यात आले आहे. स्थानिक पोलिसांवरील आरोपांबाबत सखोल चौकशी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.