सत्ता कोण स्थापन करणार आणि त्यासाठी कशी तडजोड करणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागल आहे. शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदाचा शड्डू ठोकल्यानंतर भाजपा-शिवसेनेतील चर्चेचं द्वार अद्याप खुललेले नाही. तर शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेसचे तळ्यात मळ्यात सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भा भाष्य केलं आहे. शिवसेनेकडून अधिकृत प्रस्ताव आलेला नाही, असं पवार म्हणाले.

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून दोन आठवडे उलटून गेले आहेत. मात्र, सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. दरम्यान, निवडणूक निकालात सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रित केलं आहे. त्यानंतर भाजपा जादूई आकड्याची चाचपणी करण्याबरोबरच शिवसेनेला सोबत घेण्याच्या दृष्टीने चर्चा सुरू आहे.

भाजपा-शिवसेनेचे संबंध ताणले गेले असताना जयपूरमध्ये काँग्रेस आमदारांची बैठक सुरू आहे. या बैठकीत शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्याच्या विचारात आहे. पण, काँग्रेस विरोधी पक्षात बसणार आहोत, असाही सूर काही काही नेते लावत आहेत. मात्र, पडद्याआड होत असलेल्या घडामोडींमुळे धक्कादायक वाटावा असाही निर्णय काँग्रेस घेऊ शकते.
दरम्यान, शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसला काहीअंशी अनुकूल असल्याचं दिसत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असं एक सूत्र पडद्यामागं आकार घेत असल्यानं महाशिव आघाडीचं सरकार बघायला मिळू शकते, अशीही चर्चा सुरू आहे. तर राज्यातील स्थितीबाबत काँग्रेसचं विचारमंथन सुरू असताना शरद पवार यांनीही भूमिका मांडली आहे. आघाडीबाबत शिवसेनेकडून अधिकृत प्रस्ताव आलेला नाही. अधिकृत प्रस्ताव आल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही,” असं पवार म्हणाले आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला सत्ता स्थापनेच निमंत्रण दिल्यानंतर वेगवान राजकीय घडामोडी घडत असून, मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’वर भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. मात्र, या बैठकीत कोणत्याही अंतिम निर्णयापर्यंत भाजपा पोहोचली नाही. त्यामुळे पुन्हा बैठक सुरू असून, भाजपाचे अध्यक्ष अमित शाह हे राज्यातील कोअर कमिटीच्या सदस्यांशी राज्यातील स्थितीविषयी चर्चा करत आहे.