एक जूनपासून २०० रेल्वेगाडय़ा धावणार आहेत. त्याचे आरक्षण गुरुवारपासून सुरू झाले. मोठय़ा संख्येने प्रवाशांनी तिकीटांचे आरक्षण केले. परंतु, महाराष्ट्रात राज्यांतर्गत प्रवासाचे स्वप्न पाहणाऱ्या प्रवाशांना त्याचा लाभ मिळणार नाही. या रेल्वे गाडय़ांमधून राज्यांतर्गत प्रवासाला बंदीच असावी, अशी मागणी राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाकडे केली होती. त्यानुसार राज्यांतर्गत प्रवास बंदीचे आदेश रेल्वे मंत्रालयाने तात्काळ काढले.

या आदेशानुसार, ज्या प्रवाशांनी १ जूननंतरच्या रेल्वेगाडय़ांचे राज्यांतर्गत प्रवासासाठी आरक्षण केले असेल, त्यांचे तिकीट रद्द करण्यात यावे. त्यांना तिकीटाचा पूर्ण परतावा दिला जाणार आहे. याचा संदेश प्रवाशांच्या मोबाईलवर पाठवण्यात यावा. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस येथून तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेन्ट्रल, वांद्रे टर्मिनस येथून एकूण १६ गाडय़ा सुटणार आहेत. तर मुंबईच्या दिशेने सात रेल्वे गाडय़ा येतील. या सर्व गाडय़ा राज्याबाहेर जाणाऱ्या व राज्याबाहेरून येणाऱ्या आहेत. यातील काही गाडय़ांना महाराष्ट्रातील स्थानकांमध्ये थांबा दिलेला आहे. या गाडय़ांमध्ये प्रवाशाने मुंबई ते राज्यातील एखाद्या स्थानकापर्यंतचे तिकीट काढले असेल, तर ते तिकीट रद्द होणार आहे, असे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.