मराठवाडय़ातील २४९ गावे वाळवंट होण्याची शक्यता आहे. या गावांतील भूजल उपसा १०० टक्क्यांपेक्षा अधिक झाला असून, जमीन मृतप्राय झाली असल्याचा अहवाल भूजल विकास यंत्रणेने राज्य सरकारला दिला आहे. सर्वाधिक गंगापूर तालुक्यातील ५५ गावे यात असून, औरंगाबाद व लातूर जिल्हय़ांतील स्थिती अधिक भयावह असल्याचे अधिकारी सांगतात.
लातूर जिल्हय़ाच्या सर्व तालुक्यांत भूजल पातळी केवळ खोल गेली नाही, तर १५२गावांमधील ७ पाणलोट क्षेत्रांत उपसा करण्यास पाणीच शिल्लक नसल्याचा अहवाल देण्यात आला आहे. आता या गावांमध्ये नव्याने जलपुनर्भरण करण्याबाबत प्रस्ताव द्या, असे कळविण्यात आले आहे. त्याच्या आराखडय़ाचे काम सुरू करण्यात आले असले, तरी एक जलवर्ष पूर्ण होईपर्यंत काही सांगता येणार नाही, असे या विभागातील अधिकारी सांगत आहेत.
वैजापूर व गंगापूर पट्टय़ातील ५५ गावांमधून पाणीउपसा करू नये, अशी सूचना करण्यात आल्याने या गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली, की टँकरशिवाय अन्य कोणताच पर्याय असणार नाही. जालना जिल्हय़ाच्या भोकरदन व जाफराबाद तालुक्यांतील १४ गावांमध्ये अशीच शुष्कता आली आहे. लातूर जिल्हय़ात भयावह स्थिती आहे. लातूर तालुक्यातील २१, लातूर, चाकूर, शिरूर अनंतपाळ या भागांतील २२, चाकूर तालुक्यातील २३, निलंगा तालुक्यातील २१ व नजीकच्या औसा तालुक्यातील २६ गावांमध्ये पाणीउपसा करणे शक्य नसल्याचेही कळविण्यात आले आहे.
उस्मानाबाद, कळंब व उमरगा तालुक्यांचीही अशीच स्थिती आहे. उस्मानाबाद व कळंब तालुक्यांतील १७, तर उमरगा तालुक्यातील ११ गावांमध्ये नव्याने विंधन विहिरी घेऊ नका, असे कळविण्यात आले आहे. मृतप्राय झालेल्या पाणलोटाशिवाय काही पाणलोटांचा आजार वाढला आहे. जेथे पाण्याचा उपसा ८० ते ९० टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे, अशा १९ पाणलोटांमध्येही वेगळय़ा उपाययोजना हाती घ्याव्या लागणार आहेत. खासगी विंधन विहिरी घेणाऱ्या गाडय़ांना या गावांमधून बंदी घालावी, अशीही मागणी आहे. मात्र, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल व भूजल सर्वेक्षण विभागाची यंत्रणाच नसल्याने अधिक खोल विंधन विहिरी घेऊन केला जाणारा उपसा या भागाचे वाळवंट होण्याचा प्रवास असेल, असेही सांगितले जाते. नव्याने जलपुनर्भरणासाठी तातडीने उपाययोजना करण्यासाठी आराखडे बनविले जात आहेत.