पाऊस नसल्याने भीषण दुष्काळाचे संकट घोंघावताना दिसत आहे. पीक येणार नाहीच, असे लक्षात येताच गावोगावी पीकविमा भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. डोळे कृत्रिम पावसाकडे लागले आहेत. मात्र, रडार अमेरिकेत, विमान बंगळुरूत, फवारणीचे रसायन तिसरीकडेच अशी स्थिती आहे. मंगळवापर्यंत सारे काही जुळून येईल, असे महसूल विभागातील अधिकारी सांगत आहेत. दुसरीकडे पावसाचे ढगच नसल्याचे हवामानशास्त्र विभागातील अभ्यासक सांगत आहेत.
मराठवाडय़ातील बीड, उस्मानाबाद, लातूर व परभणी या चार जिल्ह्यातील दुष्काळाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होऊ लागली आहे. चाऱ्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. ऊस कापून जनावरांना खाऊ घातला जात आहे. चाऱ्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. गतिमान वैरण विकास कार्यक्रमातून तब्बल १० कोटींची तरतूद असली, तरी पाऊसच नसल्याने चारा तरी कसा पिकवायचा, असा पेच आहे. त्यामुळे सर्वाचे लक्ष कृत्रिम पाऊस कधी पाडणार, याकडे लागले आहे.
गेल्या आठवडय़ापासून कृत्रिम पाऊस तयारीतच लटकला असल्याचे चित्र आहे. जी रसायने ढगात फवारली जातील, त्यासाठी स्फोटक परवान्याची गरज होती. तसेच औरंगाबाद विभागीय आयुक्तालयात नियंत्रण कक्षाची गरज होती. ती तयारी पूर्ण झाली आहे. तथापि रसायन फवारणारे विमान बंगळुरू येथे, तर रडार अजून अमेरिकेतच आहे. विमान रविवारी (दि. २), तर सोमवारी रडार येईल. मुंबईहून ते आणल्यानंतर त्याची जुळवणी होऊन प्रयोग हाती घेतला जाईल, असे महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, हवामानशास्त्र विभागातील अभ्यासक श्रीनिवास औंधकार म्हणाले की, ऑगस्ट महिन्यात तसे पर्जन्याचे ढग दिसत नाहीत. मोठा पाऊस पडण्याची शक्यता दिसत नाही. ढग निर्मिती होत नाही, तोपर्यंत कृत्रिम पावसाचा प्रयोगही किती यशस्वी होईल, यावर शंकाच आहेत.