पुणे : राज्याच्या बहुतांश भागात सध्या पावसाने विश्रांती घेतली असली, तरी कोकण आणि पश्चिाम महाराष्ट्रात काही ठिकणी मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम आहे. मात्र, येत्या एक-दोन दिवसांत या भागातही पावसात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पुढील चार ते पाच दिवस कुठेही जोरदार पावसाची शक्यता नाही. तुरळक ठिकाणीच केवळ हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज आहे.

हंगामातील पहिल्या दोन महिन्यांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला. जुलैमधील पावसाने कोकण आणि पश्चिाम महाराष्ट्रात अक्षरश: धुमाकूळ घातला. या दोन्ही विभागांमध्ये अनेक ठिकाणी पहिल्या दोन महिन्यांत सरासरीपेक्षा दुप्पट पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातही सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातच काही ठिकाणी पाऊस सरासरी पूर्ण करू शकला नाही. हंगामाच्या पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत कोकण, पश्चिाम महाराष्ट्रातील काही भागात जोरदार, तर राज्यात इतरत्र सर्वसाधारण पाऊस होण्याचा हवामान विभागाचा अंदाज असला, तरी पुढील काही दिवस पावसाचे प्रमाण घटणार असल्याचे दिसून येते आहे.कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणखी एक ते दोन दिवस पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. ६ ऑगस्टनंतर सर्वच ठिकाणी पाऊस कमी होणार आहे. मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश भागात पावसाची विश्रांती असेल. बुधवारी (४ ऑगस्ट) महाबळेश्वर आणि अकोला येथे मोठ्या पावसाची नोंद झाली. मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा आदी जिल्ह्यांत पावसाचा शिडकावा झाला. या सर्वच भागातील दिवसाच्या कमाल तापमानात काही प्रमाणात वाढ झाली आहे.

पाऊसभान…

कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत काही ठिकाणी ५ ऑगस्टला जोरदार पावसाची शक्यता आहे. किनारपट्टीवर वारा वाहण्याचाही अंदाज आहे. ६ ऑगस्टनंतर कोकणात सर्वच ठिकाणी पाऊस कमी होईल. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील घाट विभागात काही ठिकाणी आणखी एक दिवस मुसळधार पाऊस असेल. त्यानंतर या भागासह सर्वच राज्यांत केवळ तुरळक ठिकाणीच केवळ हलक्या पावसाची शक्यता आहे.