News Flash

परभणीत कुठे पेरणीच नाही, कुठे दुबार पेरणीवरही पाणी!

दोन वेळा पेरणी करूनही पिके न आल्याने भीषण संकट निर्माण झाले. शिवसेनेतर्फे खासदार हेमंत गोडसे व संजय जाधव यांनी जिल्ह्यातील दुष्काळी भागाची दोन दिवस

| August 27, 2014 01:55 am

परभणीत कुठे पेरणीच नाही,  कुठे दुबार पेरणीवरही पाणी!

जिल्ह्यात अनेक भागात दोन वेळा पेरणी करूनही पिके न आल्याने शेतकऱ्यांसमोर भीषण संकट निर्माण झाले. शिवसेनेतर्फे खासदार हेमंत गोडसे व संजय जाधव यांनी जिल्ह्यातील दुष्काळी भागाची दोन दिवस पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांशी या प्रश्नी मंगळवारी चर्चा केली.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार गोडसे व जाधव यांनी सोमवारी पूर्णा, पालम, गंगाखेड भागात काही दुष्काळी गावांना भेटी दिल्या. जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, उपजिल्हाप्रमुख दशरथ भोसले, तालुकाप्रमुख काशिनाथ काळबांडे, नंदू पाटील अवचार आदींसह पदाधिकारी-कार्यकत्रे उपस्थित होते. पथकाने पूर्णा तालुक्यातील ममदापूर, सुकी, गणपूर, कान्हेगाव, खुजडा, फुकटगाव, एकरुखा, खांबेगाव, ताडकळस, धानोरा काळे आदी गावांच्या शिवारांची पाहणी केली. पालम तालुक्यातील गुळखंड जवळा, पेठशिवणी, पेठिपपळगाव, तसेच गंगाखेड तालुक्यातील गावांना भेटी दिल्या. यातील अनेक गावांत पेरणीच झाली नाही, तर काही ठिकाणी दोनदा पेरूनही शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेले. ही स्थिती चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया दौऱ्यानंतर खासदार जाधव यांनी दिली.
मंगळवारीही खासदारांनी पाथरी तालुक्यातील बाभळगाव, वीटा, धामोनी या गावांना भेटी दिल्या. सोनपेठ तालुक्यातही पथक काही गावांतील शेतकऱ्यांना भेटले. सोनपेठ तालुक्यात गेल्या दोन दिवसांत पाऊस झाला असला, तरी सोयाबीनचा संपूर्ण फुलोरा झडल्यानंतर हा पाऊस आल्याने या पावसाचा पिकाला काहीच फायदा झाला नाही. जाधव यांनी सांगितले, की पेरणीच न झाल्याने शेतकरी प्रचंड अस्वस्थ आहे. ज्या गावांत शेतकऱ्यांचे पीक गेले, तेथील शेतकऱ्यांनी पोळा निरुत्साहात साजरा केला. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन जाधव यांनी स्थिती सांगितली.
भर पावसाळय़ामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर
वार्ताहर, जालना
जिल्हय़ात कमी पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले, तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही ऐन पावसाळय़ात झाल्याचे सध्या चित्र आहे.
कमी पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीची शिवसेनेच्या पथकाने मंगळवारी पाहणी केली. यानंतर पथकाने जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांची भेट घेऊन जिल्हय़ात दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता व्यक्त केली. खासदार अरविंद सावंत व सदाशिव लोखंडे, उपनेते रवींद्र मिर्लेकर, माजी मंत्री अर्जुन खोतकर, आमदार संतोष सांबरे, माजी आमदार शिवाजी चोथे, उपनेते लक्ष्मण वडले, अनिरुद्ध खोतकर यांचा पथकात समावेश होता. बदनापूर, जालना, घनसावंगी तालुक्यांतील गावांची पथकाने पाहणी केली.
जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांना माहिती देताना खोतकर यांनी सांगितले, की जिल्हय़ातील आठही तालुक्यांत आतापर्यंत अपेक्षेच्या तुलनेत निम्माही पाऊस झाला नाही. जिल्हय़ात ४९पैकी ४५ महसूल मंडळांत पावसाचे प्रमाण ५० टक्क्यांच्या आत आहे. ९० टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाल्याची शासकीय आकडेवारी असली तरी तिच्यावर विश्वास बसत नाही. अनेक शेतकऱ्यांच्या दुबार पेरण्याही वाया गेल्या आहेत. सरकारने दीडशेपेक्षा अधिक खासगी विहिरी अधिग्रहित केल्या, तर ४०पेक्षा अधिक टँकर सुरू आहेत. आठ महिन्यांत १४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. नजीकच्या काळात चांगला पाऊस न पडल्यास चाराटंचाईचा प्रश्नही तीव्र होणार आहे. सरकारने टंचाईऐवजी दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे. विहिरीत पाणी नाही. परंतु ग्रामीण भागात १८-१८ तास वीज बेपत्ता असताना कृषिपंप कसे सुरू करावेत, असा प्रश्न आहे. अशा स्थितीत कृषिपंपाच्या बिलात टंचाईच्या नावाखाली ३३ टक्के सवलत देण्याचा निर्णय योग्य ठरत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2014 1:55 am

Web Title: no rain water problem
Next Stories
1 तीन दिवसांत दमदार बरसला, पाण्याचे संकट अजून कायम
2 ‘ग्रेड कार्ड’मधून पालकांना पाल्याचे मूल्यमापन कळणार!
3 आम्हाला सत्तेची पर्वा नाही – सदाभाऊ खोत
Just Now!
X