News Flash

उजनीत उणे ३१ टक्के पाणी

आडसाली उसाचा हंगाम धोक्यात

आडसाली उसाचा हंगाम धोक्यात

बऱ्याच दिवसांच्या उघडिपीनंतर राज्यात काही ठिकाणी पुन्हा पाऊस पडू लागला असला तरी उजनी धरण परिसरात मात्र पाऊस नसल्याने धरण अद्यापही कोरडे आहे. धरणाच्या मृतसाठ्यात झालेली घट अजून भरून निघालेली नसून उजनीत सध्या उणे एकतीस टक्के पाणी आहे. धरणात समाधानकारक पाणीसाठा न झाल्याने या भागातील शेतकरी वर्ग चिंतेत असून, आडसाली उसाच्या लागवडी खोळंबल्या आहेत. याचा विपरीत परिणाम पुढील ऊस गाळप हंगामावर होण्याची शक्यता आहे.

एकूण एकशे दहा टीएमसी पाणीसाठा साठवण क्षमता असलेल्या उजनी धरणात केवळ सेहेचाळीस टीएमसी पाणी उपलब्ध आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी चौसष्ट टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. उजनीच्या पाणलोट क्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी धरणात पाणी येण्याची वाट पहात आहे, तर लाभक्षेत्र असलेल्या सोलापूर जिल्ह्य़ातील शेतकरी चिंतातूर झाला आहे.

पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्य़ातील साखर कारखानदारी उजनी धरणातील पाण्यावर मोठय़ा प्रमाणात अवलंबून आहे. परंतु, धरणात पावसाअभावी पाणी नसल्यामुळे ऊसाच्या लागवडी शेतकऱ्यांनी थांबवल्या आहेत. याचा परिणाम पुढील ऊस गाळप हंगामावर होणार आहे. ऊस लागवडी नसल्याने या परिसरातील शेतकरी पीक कर्ज घेऊ शकत नसून त्यामुळे उजनीच्या पाणलोट क्षेत्र परिसरातील अर्थकारण आणि व्यवहार थंडावले आहेत. साखर कारखान्यात गाळप होणाऱ्या उसात सुमारे पन्नास टक्के ऊस आडसाली असतो व याच लागवडीवर कारखान्याची बरीच गणिते अवलंबून असतात. अठरा महिने शेतात असलेल्या या उसाला साखर उतारा व चांगले वजन मिळत असल्याने या ऊस लागवडीला कारखानदार व ऊस उत्पादक दोघांकडून अग्रक्रम दिला जातो. परंतु उजनीत पाणी नसल्याने आडसाली ऊस लागवड हंगाम धोक्यात आला आहे.

वीजकपातीचे संकट कायम

उजनीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने चार महिन्यांपूर्वी पाणलोट क्षेत्रातील उपसा जलसिंचन योजनांच्या कृषी पंपांची वीजकपात करण्यात आली आहे. ती कपात अद्यापही तशीच असून उजनीवरील कृषी पंपांबरोबरच या परिसरातील विहिरींवरील कृषी पंपांच्या विद्युत पुरवठय़ातही कपात करण्यात आली आहे. गव्हाबरोबर किडे रगडण्याचे काम सरकार करीत असून विनाकारण विहिरीवरील कपात केलेला वीजपुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन करावे लागेल, असे या ठिकाणचे विहीर बागायतदार म्हणत आहेत.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 12:06 am

Web Title: no rainfall in ujjani dam
Next Stories
1 मुंबई- गोवा महामार्गावर रस्त्यांची दुरवस्था
2 ताडोबातील व्याघ्रवैभव आता जगाच्या नकाशावर
3 विद्यार्थ्यांच्या छळाच्या १६ घटनांची नोंद
Just Now!
X