06 July 2020

News Flash

राष्ट्रीय आरोग्य अभियानातून अडीच हजार पदे रद्द?

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनमधील २५६२ पदे कमी करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. अशी पदे कमी करून या अभियानातून ४० कोटी २० लाख रुपयांची बचत

| February 9, 2015 01:20 am

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनमधील २५६२ पदे कमी करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. अशी पदे कमी करून या अभियानातून ४० कोटी २० लाख रुपयांची बचत होऊ शकेल, असा अंदाज आरोग्य संचालकांनी बांधला आहे. ही पदे प्रशासनात सुसूत्रता आणण्यासाठी कमी करण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे. कोणती पदे कमी करावीत, याविषयीचे अभिप्राय जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांकडून मागविण्यात आले आहेत. आरोग्य विभागात रिक्त पदांची संख्या मोठी आहे. परिणामी, काही जिल्हय़ांत तर ग्रामीण भागातील नागरिकांना खासगी रुग्णालयात जाऊन अधिक पैसे खर्च करावे लागतात. सरकारी यंत्रणा या क्षेत्रातून अंग काढून घेत असल्याचे चित्र असतानाच निर्माण केलेली पदेही रद्द ठरवता येतील काय, याचा अंदाज घेतला जात आहे.
 विशेषत: नर्सिग केंद्रातील पदे कमी करण्याचा प्रयत्न सुरूआहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात मोठय़ा प्रमाणात बांधकामाचा सपाटा गेली दहा वष्रे सुरू होता. अनेक ठिकाणी इमारती उभ्या राहिल्या, मात्र त्यात पदेच भरली गेली नाहीत. जेथे आवश्यक आहे तेथे कंत्राटी पदे भरण्याची पद्धत स्वीकारली गेली, मात्र अधिकाऱ्यांनी या अभियानाकडे सातत्याने दुर्लक्ष केले. अगदी ‘आशा’ कार्यकर्त्यांना केलेल्या कामाचे पैसे मिळावेत यासाठी कार्यालयात खेटे घालावे लागतात. कोटय़वधी रुपये मिळूनही बऱ्याच क्षेत्रांत हे अभियान यशस्वी होऊ शकले नाही. अगदी औषध पुरवठय़ातील नेहमीचे गोंधळ दूर करता आले नाहीत.  दरम्यान, आरोग्य मिशनमध्ये किती कर्मचाऱ्यांची गरज आहे, याचा आढावा घेण्याची प्रक्रिया सुरूझाली आहे.
 राज्यात १० हजार ३२५ पदांपैकी ९२३९ पदे भरण्यात आली होती.  या सगळय़ा पदांची गरज आहे काय, पदे कमी केल्यास त्यांच्या जागी कोणती यंत्रणा काम करू शकेल, याविषयीची माहिती आरोग्य संचालकांनी मागितली आहे. यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी तब्बल २ हजार ५६२ कर्मचारी काढता येऊ शकतील, असा अभिप्राय दिला आहे. पदे कमी करून पैसे वाचविण्याचे केलेले नियोजन योग्य नसल्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे. खरेतर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानामधील प्रमुख पदांवर सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा भरणा आहे. त्यांच्या पदाला धक्का न लावता कंत्राटी पद्धतीवरील कर्मचाऱ्यांना काढण्याचा प्रयत्न पुढील आर्थिक वर्षांपासून करण्याचा घाट असल्याचे या मिशनमधील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2015 1:20 am

Web Title: no recruitment in national health campaign
टॅग Aurangabad
Next Stories
1 मल्लिनाथ महाराजांविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी गुन्हा
2 अस्वस्थतानाटय़ाने नाटय़संमेलनाचा प्रारंभ!
3 रंगभूमीच्या भवितव्यासाठी बालनाटय़ चळवळीची गरज
Just Now!
X