रत्नागिरी : माझा विकासाला विरोध नाही. पण कोकणात रिफायनरी प्रकल्प नकोच,  असे आग्रही प्रतिपादन  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकवार केले आहे.

गेले तीन दिवस ठाकरे सिंधुदुर्ग- रत्नागिरीच्या दौऱ्यावर असून शुक्रवारी रत्नागिरीत पत्रकारांशी अनौपचारिकपणे बोलताना त्यांनी   नाणार परिसरातील नियोजित तेल शुध्दीकरण प्रकल्पाला स्पष्ट विरोध दर्शवला. कोकणासारखी सुपीक जमीन देशात कुठेच मिळणार नाही. येथील फळे, खाद्यपदार्थ अन्यत्र कुठेही नाहीत. एवढे सगळे असतानाही जमिनी  विकून तुम्ही करणार काय, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. माझा विकासाला विरोध नाही पण रिफायनरीची कोकणात गरज नाही, हा प्रकल्प दुसरीकडे कुठेही न्यावा  असे त्यांनी ठणकावले.

रिफायनरी गुजरातमध्ये नेऊ, असे मुख्यमंत्री सांगतात. प्रकल्प कुठेही न्या, पण इथे नको. पंतप्रधानांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री वाट्टेल ते बोललात. प्रकल्प न्यायचा असेल तर अन्य राज्यात कुठेही न्या. गुजरातच कशाला हवे, असा टोला त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना हाणला.

याच मुद्द्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विधानाची खिल्ली उडवताना राज म्हणाले की,  प्रकल्पासाठी भूसंपादनाची   अधिसूचना रद्द झालेली नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खोटे बोलतात. आतून सगळे एक आहेत. हे नाणार प्रकल्पावरूनच समजते. ज्यांनी निवडून दिले आहे त्यांच्यापुढे विद्यमान आमदार, खासदार धडधडीत खोटे बोलतात. मात्र पुढचा राजापूरचा आमदार मनसेचा होईल का, हे लोकांनी ठरवायचे आहे.

केरळसारखे पर्यटन देशात कुठेच नाही, येथेही हे शक्य आहे. पण येथे जो तो येतो तो म्हणतो मी विदर्भाचा, मी मराठवाडय़ाचा, मी पश्चिम महाराष्ट्राचा. असे म्हणून कसं चालेल? विकास सर्वसमावेशक असला पाहिजे, असे मत नोंदवून ठाकरे म्हणाले की,  मुंबई -गोवा महामार्गाचं काम आघाडी सरकारच्या काळापासून सुरु आहे. आता पाऊस जवळ आला आहे, त्यामुळे सध्या चालू  असलेल्या कामांची स्थिती काळजी करण्यासारखी आहे.  आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने  चीनमध्ये अल्प काळात रस्ते पूर्ण होतात, मात्र आपल्याकडे वेळकाढू कंत्राटदारांचे हितसंबंध जोपासण्यासाठी प्रयत्न होतात. मग विकास कसा होईल, असा सवालही त्यांनी या संदर्भात बोलताना उपस्थित केला.