अन्वय नाईक प्रकरणी सध्या अटकेत असलेले रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जामीन याचिकेवरील सुनावणी न्यायालयानं शनिवारीपर्यंत पुढे स्थगित केली. उद्या (७ नोव्हेंबर) या याचिकेवर सुनावणी केली जाणार आहे.

वास्तूविषारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केली आहे. न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर अर्णब गोस्वामींनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी धाव घेतली होती. गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. मात्र, त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि एम.एस. कर्णिक यांच्या दोन सदस्यीय खंठपीठासमोर उद्या १२ वाजता याचिकेवर सुनावणी होणार आहे. वेळेअभावी न्यायालय उद्या याचिकेवर सुनावणी घेईल. उद्या दुपारी या प्रकरणावरील विशेष सुनावणी घेतली जाईल, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

मूळ प्रकरणावर एक नजर…

मूळच्या अलिबागमधील कावीर येथील अन्वय नाईक यांचा मुंबईत ‘कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड’ नावाचा वास्तुसजावटीचा व्यवसाय होता. ते ४ मे २०१८ रोजी कावीर येथील निवासस्थानी आले होते. दुसऱ्याच दिवशी (५ मे) अन्वय यांच्यासह आई कुमूद यांचा मृतदेह नोकरांना घरात आढळला. पोलिसांना तिथे आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली. अर्णब गोस्वामी, ‘आयकास्ट स्काय मीडिया’चे फिरोज शेख, ‘स्मार्टवर्क्‍स’चे नीतेश सारडा या तिघांनी पैसे थकवल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे अन्वय यांनी या चिठ्ठीत नमूद केले होते.

त्यांच्या पत्नी अक्षता यांच्या तक्रारीवरून या तिघांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. तपासात काहीही निष्पन्न झालेले नसल्याचा अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर केल्यानंतर तपास बंद करण्यात आला. मात्र या प्रकरणाचा तपास पुन्हा करण्याची विनंती अन्वय यांची पत्नी आणि मुलीने राज्य सरकारकडे केली होती. त्यानंतर या प्रकरणाच्या फेरतपासाचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले होते.