चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना

चंद्रपूर : भंडारा जिल्हय़ातील प्रतापगड येथून देवदर्शन घेऊन परत येत असताना चंद्रपूर- मूल मार्गावरील केसलाघाट ते नागाळा गावादरम्यान रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकला भरधाव स्कॉर्पिओ गाडीची धडक लागली. या अपघातात सहा जण जागीच ठार झाले तर सात जण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी रात्री घडली. मृतांमध्ये दोन पुरुष, तीन महिला व एका दोन वर्षीय मुलाचा समावेश आहे. जखमीमध्ये चालकासह पाच महिलांचा समावेश आहे.

शहरातील बाबूपेठ परिसरातील भोयर व पाटील कुटुंबीय देवदर्शनासाठी भंडारा जिल्ह्यतील प्रतापगड येथे स्कॉर्पिओने गेले होते. बुधवारी रात्री उशिरा हे कुटुंबीय मूल मार्गे बाबूपेठ येथे परतत असताना चंद्रपूर मार्गावरील केसलाघाट ते नागाळा दरम्यान रस्त्यावर अंधारात उभा असलेला ट्रक स्कॉर्पिओ चालकाला दिसलाच नाही व काही कळायच्या आत स्कॉर्पिओने ट्रकला भीषण धडक दिली. ग्रामस्थांनी धाव घेत जखमींना वाचवण्याची धडपड सुरू केली. सर्वाना मूल उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले. या अपघातात मृतांमध्ये संभाजी भोयर (७७), कुसुम भोयर (६५), जियान भोयर (२), दत्तू झोडे (५०), मीनाक्षी झोडे (३३), शशिकला वांढरे (६५) यांचा समावेश आहे. अपघातातील जखमीं जितेंद्र पटपल्लीवार, मीनाक्षी भोयर, अंकिता पेटकुले, क्रिश पाटील, सोमी पाटील, शीतल पाटील व रेखा खटिकर यांना रात्री उशिरा चंद्रपूर येथील शासकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. जखमींची प्रकृती सध्या स्थिर आहे.

याप्रकरणी मूल पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातातील मृतांवर आज गुरुवारी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

भोयर, झोडे व पाटील कुटुंबीय नवस फेडण्यासाठी प्रतापगड येथे गेले होते. नवस फेडून चंद्रपूरला परत येत असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातात भोयर या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.