नोकरभरतीत परप्रांतीयांना स्थान मिळाले त्यामुळे एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये तोडफोड झाली अशी माहिती आमच्यापर्यंत आली आहे असे मराठा क्रांती मोर्चा समन्वयक समितीने म्हटले आहे. पुण्यात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. औरंगाबादमध्ये काही वेळापूर्वी याच संदर्भात पत्रकार परिषद पार पडली त्यात कंपन्यांमध्ये तोडफोड करणारे मराठा आंदोलक नव्हते अशी भूमिका मांडण्यात आली. खासगी कंपन्यांनी नोकर भरती करताना नोकऱ्यांची पद्धत कंत्राटी केली. तसेच त्या नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्यात आले नाही असेही औरंगाबादमध्ये सांगण्यात आले.

दरम्यान पुण्यातील चांदणी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याबद्दल मराठा क्रांती मोर्चा समन्वयक समितीने दिलगिरी व्यक्त केली आहे. पुण्यात तोडफोड करणारे कार्यकर्ते मराठा आंदोलक नव्हते. हे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय असाही आरोप यावेळी समितीने केला. दरम्यान औरंगाबाद आणि पुण्यात जे घडले त्यानंतर मराठा समाजाने रस्त्यावर उतरून आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला आहे. जे निर्दोष कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्या नाहीतर १५ ऑगस्टपासून चूलबंद आंदोलन करू असाही इशारा देण्यात आला आहे. ज्यांनी जाळपोळ केली, तोडफोड केली त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेऊ नका असेही समितीने स्पष्ट केले आहे.