जिल्ह्य़ात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ११० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. मात्र, गेल्या ३ दिवसांपासून दररोज ढगाळ वातावरण असतानाही वरुणराजा हुलकावणी देत आहे. दिवसभरात ऊन-सावल्यांचा खेळ सुरूअसून पेरणीची कामे अजूनही रखडलेलीच आहेत. रिमझिम पाऊस झाला असला, तरी शेतकऱ्यांना मोठया पावसाची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्य़ात खरिपाच्या सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ६ लाख २१ हजार ४८४ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली. गतवर्षी याच कालावधीत पावणेआठ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली होती. या वर्षी मात्र शेतकरी अजूनही मोठय़ा पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. कापूस लागवडीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत झालेल्या पावसावरच लागवड करून घेतली. ३ लाख ३८ हजार ९३४ हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी कापूस लागवडीचे प्रमाणही घटले आहे. जुलच्या अखेरच्या टप्प्यात पाऊस पडेल, या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली. पण दिवसेंदिवस केवळ ऊन-पावसाचा खेळच पाहायला मिळत असून शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
ज्या शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली होती, त्यांच्यावर आता दुबार लागवडीचे संकट उभे ठाकले आहे. जूनपासून सुरूझालेल्या पावसाने अजूनही वार्षकि सरासरीच्या तुलनेत हजेरी लावली नाही. जूननंतर जुलही कोरडाच जाऊ लागला आहे.