महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यात मागील पाच वर्षांमध्ये चार विचारवंताची हत्या झाली. महाराष्ट्रातल्या तपास यंत्रणेचा वेग मंदावला आहे मात्र कर्नाटकमध्ये दुसऱ्या विचारांचे सरकार असूनही समाधानकारक तपास होतो आहे अशी भूमिका मेधा पानसरे यांनी मांडली. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला पाच वर्षे झाल्याने पुण्यात विवेकवादी चळवळीच्या वतीने ‘जवाब दो!’ आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. त्यांची हत्या झाल्यानंतर काही महिन्यातच गोविंद पानसरे यांनाही ठार करण्यात आले. जवाब दो रॅलीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मेधा पानसरे यांनी आपली भूमिका मांडली. महाराष्ट्रात भाजपा सरकार असल्यानेच तपासाला गती मिळू शकली नाही असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच या दाभोलकर, पानसरे हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड शोधावा अशीही मागणी त्यांनी केली.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज पाच वर्ष पूर्ण झाली. असे असूनही या  हत्येमागचा मास्टरमाईंड सापडलेला नाही. याच गोष्टीचा निषेध करत आज पुण्यातील विठ्ठल रामजी शिंदे पूल,लक्ष्मी रोड,अलका चौक, दांडेकर पूल,साने गुरुजी स्मारक या मार्गावर ‘जवाब दो!’ निषेध रॅली काढण्यात आली.या रॅलीनंतर साने गुरुजी स्मारक येथे झालेल्या कार्यक्रमानंतर मेधा पानसरे या पत्रकारांशी संवाद साधताना भूमिका मांडली. यावेळी मेधा पानसरे म्हणाल्या की, मागील पाच वर्षांच्या काळात नरेंद्र दाभोलकर ते गौरी लंकेश या पाच विचारवंतांची हत्या करण्यात आली.या मागील मुख्य सूत्रधार पकडण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे.या तपासाला गती मिळण्याची आवश्यकता होती.त्या मानाने गती मिळाली नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आजवर अनेक वेळा सनातन या संस्थेवर बंदी आणावी अशी मागणी करण्यात आली आहे.तरी देखील यावर निर्णय सरकार घेत नाही. अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्या पुढे म्हणाल्या की,सध्या समाजात धर्म आणि सामाजिक सुधारणा यामध्ये मोठ्या प्रमाणावर संघर्ष दिसून येत आहे.यामुळे सामाजिक चळवळ एका टोकाला आल्याचे पाहण्यास मिळते.याकडे सर्वानी गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी केले.