देयके थकीत ठेवल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यालयांची सेवा खंडित
निखिल मेस्त्री,लोकसत्ता
पालघर : पालघर जिल्ह्यच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे जिल्हा परिषदेचे विविध विभाग कार्यालये व आठ पंचायत समिती कार्यालयाचे दूरध्वनी (टेलिफोन) बंद असल्याने ही कार्यालये संपर्क क्षेत्राबाहेर गेली आहेत. या कार्यालयाचे दूरध्वनी बंद असल्याने नागरिकांनी संपर्क साधायचा कुठे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या जिल्ह्यच्या कार्यालयांची दूरध्वनी देयके थकीत असल्याने दूरध्वनी जोडणी कापली असल्याचे समजते. पालघर जिल्ह्यतील नागरिकांना जिल्ह्यतील जिल्हा परिषद कार्यालये व पंचायत समिती कार्यालयांना संपर्क साधण्यासाठी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर या सर्व कार्यालयांचे दूरध्वनी संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. मात्र हे सर्व क्रमांक बंद स्थितीत आहेत. त्यामुळे नागरिकांना या कार्यालयाला संपर्क करणे जिकिरीचे होऊन बसले आहे. हे दूरध्वनी क्रमांक संपर्क क्षेत्राबाहेर असल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर नागरिकांच्या सोयीसाठी विविध विभाग व पंचायत समित्यांचे दूरध्वनी क्रमांक दिले आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेशी निगडित सतरा तर आठ पंचायत समितीचे संपर्क दर्शविलेले आहेत. यातील माध्यमिक, समाजकल्याण, जि. प.रोहयो, पाणी व स्वछता विभागात तर दूरध्वनी अस्थापित केलेले नाहीत. तर जिल्हा परिषदेचे इतर बारा महत्त्वाच्या विभागाचे दूरध्वनी बंद स्थितीत आहेत व आठही पंचायत समितीचे दूरध्वनीही बंद आहेत. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण, कृषी व पशुसंवर्धन, महिला बालकल्याण, बांधकाम व अर्थ विभागाचे सभापती दलनातील दूरध्वनीही बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना या विभागाला संपर्क करणे गैरसोयीचे होत आहे.
या सर्व विभागाने आपापल्या दूरध्वनीचे दूरध्वनीची देयके गेल्या अनेक महिन्यांपासून थकविल्याने दूरध्वनी सेवा देणाऱ्या बीएसएनएलने ही सेवा खंडित केली आहे. याच बरोबरीने काही ठिकाणी तांत्रिक अडचणी असल्याने हे दूरध्वनी बंद असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत जिल्हा परिषदेकडे विचारणा केली असता देयकांचा हा खर्च त्या त्या विभागाने आपल्या सादील खर्चातून भागवायचा आहे असे म्हटले आहे. मात्र या सादील खर्चाला मान्यता मिळाली नसल्याने अजूनही ही देयके प्रलंबित आहेत. तर काही ठिकाणी ही देयके भरण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.
नाइलाजास्तव कार्यालयांच्या फेऱ्या
सध्या करोनास्थिती असल्याने जिल्हावासीयांनी कुठल्याही शासकीय कार्यालयात भेट देऊ नये असे आवाहन प्रशासन वारंवार करीत आहे. मात्र जिल्हावासीयांच्या सोयीसाठी व संपर्कासाठी ठेवलेले हे दूरध्वनी क्रमांक संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याने नागरिकांना नाइलाजास्तव प्रशासकीय कार्यालयात जाऊन आपली कामे करून घ्यावी लागत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 15, 2021 12:03 am