विलासराव देशमुख यांचे राजकीय गुरू शंकरराव चव्हाण यांच्या निधनास १० वर्षे उलटली. त्यांचा येथील पूर्णाकृती पुतळा अनावरणाच्या प्रतीक्षेत ऊन, थंडी, पाऊस झेलत असताना शिष्य विलासरावांच्या पुतळय़ाचे लातूरजवळ उबदार कमानीखाली सोमवारी लोकार्पण झाले.
शंकररावांनी नावारूपास आणलेल्या शारदा भवन शिक्षण संस्थेच्या परिसरात, शासन निधीतून शंकरराव चव्हाण स्मृती संग्रहालय ही वास्तू उभी राहिली. या परिसरात मराठवाडय़ाच्या जलदूताचा पूर्णाकृती पुतळा सहा महिन्यांपूर्वी उभारला. अनावरणाविना पुतळय़ाभोवती सध्या कापडी आवरण गुंडाळले आहे.
शंकररावांनंतर तब्बल ८ वर्षांनी विलासरावांची जीवनयात्रा थांबली. त्यानंतर त्यांचे आप्त, निकटवर्तीयांनी एकत्र येऊन लातूरजवळ रेणा कारखाना परिसरात त्यांचा पुतळा उभारण्याचे ठरविले. विलासरावांचा तिसरा स्मृतिदिन येण्यापूर्वीच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पंजाबचे राज्यपाल शिवराज चाकूरकर आदींच्या उपस्थितीत पुतळय़ाचे अनावरण करताना देशमुख कुटुंबाने माजी मुख्यमंत्री व शंकररावांचे पुत्र खासदार अशोक चव्हाण यांना मात्र आमंत्रित करण्याचे खुबीने टाळले. त्यामुळे लातूर-नांदेड दरम्यान दरी कायम असल्याचा संदेश यातून गेला.
प्रमुख पाहुणे किंवा निमंत्रितांच्या यादीत अशोक चव्हाण यांचे नाव नव्हतेच, हे गेल्या आठवडय़ात स्पष्ट झाले होते. इतकेच नव्हे, तर नांदेडातील महत्त्वाच्या राजकीय नेत्यांना लातूरच्या कार्यक्रमाचे निमंत्रणही नव्हते. चव्हाण, खतगावकर आदी नेत्यांना संयोजकांनी डावलले असताना नांदेडचेच आमदार ओमप्रकाश पोकर्णा मात्र कार्यक्रमाला मुद्दाम गेल्यानंतर संयोजकांनी नांदेडचा प्रतिनिधी म्हणून त्यांना व्यासपीठावर स्थान दिले. पोकर्णा यांची साधी उपस्थितीही लक्षवेधी ठरली.
शंकरराव व कुसुमताई चव्हाण यांच्या निधनानंतर अशोक चव्हाण यांनी नांदेडात उभारलेल्या कुसुम सभागृहाच्या उद्घाटन सोहळय़ात चाकूरकरांना आमंत्रित करताना विलासरावांना डावलले होते. आता देशमुख परिवाराने तोच कित्ता गिरवला आहे.