अन्य जिल्हा किंवा परराज्यातून रत्नागिरी जिल्ह्यात कुणालाही विनापास किंवा विनापरवाना प्रवेश दिला जाणार नाही, असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.

याचबरोबर, जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांना इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार १४ दिवस अलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. असेही मुंढे यांनी नमूद केले.

गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठय़ा संख्येने गावी येऊ लागले आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवरील कशेडी येथील तपासणी नाक्यावर चाकरमानींच्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी झाली. म्हणून कागदपत्रे न तपासतात सोडले जात असल्याचा संदेश समाजमाध्यमांवर फिरत होता. म्हणून डॉ. मुंढे यांनी हा खुलासा केला आहे.

दरम्यान, बनावट पास दाखवून जिल्ह्यात प्रवेश करू पाहणाऱ्या एक खासगी बस पोलिसांनी रविवारी रात्री पकडून चालक-मालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. या बसमध्ये ३० प्रवासी होते. बसच्या मालकाने पाससाठी प्रत्येकी ५०० रूपये घेतल्याचे त्यांनी सांगितले. या प्रवाशांना आपापल्या गावी जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली.

अन्य जिल्ह्यातून गावी आल्यावर किती दिवस अलगीकरणात राहावे लागेल, याबाबतही संभ्रम होता. हा कालावधी ७ दिवसांचा असावा, अशी मागणी चाकरमानींकडून केली जात होती. पण वैद्य्कीय क्षय मार्गदर्शक तत्त्वांनुसार तो १४ दिवसांचाच राहील, असेही डॉ. मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.