विधानसभेसह लोकसभेची पोटनिवडणूक महिन्यावर येऊन ठेपली. मात्र, ४६ हजार ६१७ मतदारांकडे ओळखपत्रे नसल्याची माहिती समोर आली आहे. ज्यांच्याकडे ओळखपत्रे नाहीत, अशा मतदारांना ‘बीएलओ’मार्फत मिळणाऱ्या चिठ्ठीच्या आधारे मतदान करता येईल, असे प्रशासनाने जाहीर केले आहे. परंतु मतदारांना व्होटर स्लिप मिळत नसल्यामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुकीत याचा अनुभव मतदारांना आला.                  जिल्हय़ातील ६ विधानसभा मतदारसंघ, तसेच लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी १५ ऑक्टोबरला एकाच वेळी मतदान होणार आहे. या साठी जिल्हा प्रशासनाने मतदार नोंदणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यात वाढ झाली असली, तरी एकूण मतदारांच्या ४ टक्के मतदार अजूनही ओळखपत्रांपासून वंचित आहेत. जिल्ह्य़ातील एकूण १८ लाख १७ हजार ७७९ पकी १७ लाख ६२ हजार ७१० मतदारांकडेच ओळखपत्रे आहेत. इतर ४६ हजार ६१७ मतदारांकडे ओळखपत्र नाही. ओळखपत्र नाही, अशा मतदारांचे यादीत नाव असल्यास त्यांना ‘बीएलओ’कडून व्होटर स्लिप देण्यात येणार आहे. या स्लिपच्या आधारे मतदारांना मतदान करता येईल. परंतु यापूर्वी लोकसभा निवडणुकीत व्होटर स्लिपबाबत मतदारांना वाईट अनुभव आले आहेत. मतदानांच्या शेवटच्या दिवसापर्यंतही अनेकाना व्होटर स्लिपच प्राप्त झाली नाही. त्यामुळे मतदानाच्या दिवशी अनेक केंद्रांवर गोंधळ उडाला. मतदारयादीत नाव असूनही व्होटर स्लिपअभावी अनेकांना मतदान करता आले नाही. काही मतदारांनी आपल्याकडील इतर ओळखपत्राच्या आधारे मतदानाचा हक्क बजावला. परंतु ज्यांच्याकडे कोणतेच ओळखपत्र नव्हते, त्यांना मात्र नाव असूनही मतदान करता आले नाही. या वेळीही व्होटर स्लिपबाबत असा गोंधळ होऊ शकतो. जिल्हा प्रशासनाने या साठी समिती गठीत केली. यात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी व इतरांचा समावेश आहे.