पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणी साठा लक्षात घेतला तर शहराला नियमित पाणी पुरवठा होणार आहे. साधारण दहा दिवसांनी फेर आढावा घेतला जाईल. जून अखेरपर्यंत पाणी कपातीचा निर्णय घेतला जाणार नाही अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणे महापालिकेत अधिकारी वर्गाशी झालेल्या चर्चेनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. त्याच पत्रकार परिषदेत गिरीश बापट यांनी ही माहिती दिली. त्यामुळे जून महिन्यापर्यंत एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.

पुणे शहराला खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मागील वर्षी धरण क्षेत्रात पाऊस कमी झाल्याने आजच्या दिवशी सहा टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तसेच पुढील तीन महिन्याचा विचार करता आणि जलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशानुसार पाण्याचे वाटप करायचे झाल्यास पुणेकर नागरिकांना पाणी कपातीला सामोरे जावे लागणार हे निश्चित होते. मात्र आज पुणे महापालिकेत पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली पाणी नियोजनाबाबत बैठक झाली. त्यावेळी महापालिका आयुक्त सौरभ राव, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे, आमदार योगेश टिळेकर तसेच अधिकारी उपस्थित होते. यावेळी शहराच्या पाणी नियोजना बाबत चर्चा देखील झाली. या बैठकीनंतर पाणी कपात होणार नसल्याचे सांगितल्याने पुणेकर नागरिकांना किमान जून अखेरपर्यंत तरी दिलासा मिळाला आहे.