निसर्ग चक्रीवादळानंतर एक रुपयाची मदत आजपर्यंत नुकसानग्रस्तांना मिळालेली नाही. सरकारचं अस्तित्त्व आहे असं दिसत नाही. लोकांच्या निवाऱ्याची सोय बस स्टँडच्या शेडमध्ये करण्यात आली आहे. काहींना शाळांमध्ये कोंबून ठेवण्यात आलेलं आहे. जेवणाची व्यवस्था नाही, सोशल डिस्टन्सिंग नाही. हे सगळं विदारक चित्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर आम्ही मांडलं आहे अशी माहिती आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. देवेंद्र फडणवीस हे दोन दिवस कोकण दौऱ्यावर होते. तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आज त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी अद्याप कोकणात एक रुपयाचीही मदत मिळाली नसल्याचं म्हटलं आहे.

विशेषतः निसर्ग वादळात ज्यांचं नुकसान झालंय त्या नुकसानग्रस्तांना रोख मदत मिळाली पाहिजे. ज्या लोकांना केरोसीन मिळत नाही त्यांना ते मिळालं पाहिजे. घरांवरचे जे पत्रे आहेत त्याचा काळाबाजार सुरु आहे. हा काळा बाजार तातडीने बंद झाला पाहिजे आणि लोकांना हे पत्रे उपलब्ध करुन दिले पाहिजेत. वीजेचे खांब अनेक ठिकाणी पडले. वीजेचं रिस्टोरेशन अत्यंत महत्त्वाची बाब आहे, या सगळ्या गोष्टींकडे आम्ही मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पिण्याच्या पाण्याचीही सोय करावी लागेल. मासेमारी करणारे जे मच्छिमार बंधू आहेत त्यांचा डिझेलचा परतावा दिला तर काही पैसे त्यांच्या खिशात येतील. त्यांच्या बोटींचंही नुकसान झालंय त्यासाठीही त्यांना पैसे द्यावे लागतील. त्यांचं कर्ज माफ करावी, दीर्घकाळाची मदत कशी करता येईल याचा विचार करावा अशीही मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

शेतकऱ्यांच्या संदर्भातही काही मागण्या केल्या आहेत. ५० हजार रुपये हेक्टरी मदत ही अत्यंत तोकडी मदत आहे. त्यापेक्षा जास्त मदत आपण त्यांना केली पाहिजे अशीही मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ५०० रुपये प्रति गुंठा अशी मदत मिळणार आहे. पिकाचं नुकसान झालं तर पुढच्या वर्षी पिक येतं. झाडं उन्मळून पडली तर पुढच्या वर्षी ती येत नाहीत. त्यामुळे त्यांचं कर्ज माफ करा आणि दीर्घ काळासाठी कर्ज कसं देता येईल याचा विचार झाला पाहिजे अशीही मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.