डवरी गोसाव्यांची वस्ती दहशतीच्या सावटाखाली

उस्मानाबाद : नाथ डवरी समाजातल्या सत्तरीतल्या केसरबाई पिराजी शिंदे ३५ वर्षांपूर्वी मुलाला शिकविण्यासाठी गाव सोडून उस्मानाबाद शहरात आल्या. उपजीविका परंपरेने भीक मागून. मुलाला शिकवायचे म्हणून त्यांनी कष्ट सोसले. पण मुलाला शिकवले. तो पदवीधर झाला. पण नोकरी काही लागली नाही. आता तोही भीक मागूनच आपला उदरनिर्वाह भागवतो. धुळे येथे भटक्या जमातीतील पाच जणांची हत्या झाल्यानंतर गावोगावच्या वस्त्यांमध्ये दहशत पसरली आहे. ते प्रश्न विचारतात, भीक मागून तरी आम्ही जगायचे की नाही?

महाराष्ट्रात भटक्या-विमुक्तांची संख्या सुमारे १२ टक्क्यांच्या घरात आहे. त्यात नाथ डवरी गोसावी समाज दोन टक्क्यांच्या आसपास आहे. राज्यातील वाशीम, परभणी, हिंगोली, नांदेड, मुंबई आणि उस्मानाबाद जिल्ह्यंत डवरी समाजाची संख्या तुलनेने अधिक आहे. राज्यात भटक्यांच्या ५२ जाती आहेत आणि उपजातींची संख्या दोनशेच्या घरात आहे. वेगवेगळे वेश धारण करून भिक्षुकी करणे हा या समाजाच्या चरितार्थाचा मुख्य स्रोत आहे. धुळे येथे भीक मागण्यासाठी गेलेल्या अशाच पाच जणांना संशयावरून ठार केल्याच्या बातमीने उस्मानाबाद शहरातील सांजा रोड आणि बेंबळे रोड परिसरातील डवरी गोसाव्यांच्या वस्तीवर दहशतीचे सावट पसरले आहे. पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या तरुणांना नोकरी नाही. भीक मागायला जावे तर जिवाची धास्ती आहे. अशा वेळी पोटाची खळगी भरण्यासाठी काय करावे, असा सवाल प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उभा ठाकला आहे.

भाऊराव शिंदे आणि सुदाम सावंत दोघेही आता थकले आहेत. आयुष्यभर खाकी वर्दी अंगावर चढवून पोलिसांची हुबेहूब नक्कल करण्यात आयुष्य गेले. कोणत्याच सरकारने कधीच आमच्या पोटाची काळजी केली नाही. ‘शोले’ सिनेमातील धर्मेद्र आणि अमिताभ बच्चनच आमचा वाली आहे. त्याचे ‘डायलॉग’ म्हणूनच पोटाची खळगी भरीत आलो असल्याची प्रतिक्रिया ८० वर्षीय भाऊराव शिंदे यांनी दिली. केवळ संशयावरून जिवानिशी मारून टाकत असतील तर आमच्या लेकरांनी जगायचे कसे, हा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. बारावी उत्तीर्ण झालेल्या आपल्या मुलाने तरी आपल्या डोळ्यादेखत खराखुरा पोलीस व्हावे हे स्वप्न सुदाम सावंत यांना बेचन करून जात आहे.

भीमराव शिंदे हे ४२ वर्षांचे. कुस्तीमध्ये राष्ट्रीय पातळीवरील पदक पटकाविले आहे. पुण्याच्या राष्ट्रीय भाषा अकादमीने घेतलेल्या परीक्षेत १९९१ साली ते अव्वल आले होते. जिल्हा परिषद, सार्वजनिक आरोग्य विभाग अशा किती तरी ठिकाणी त्यांनी नोकरीसाठी प्रयत्न केले. अर्ज भरण्यातच पाच-पन्नास हजार रुपये खर्ची पडले. आता नोकरीचा विषय सोडून भीमराव भीक मागून स्वत:चे पोट भरत आहे. स्वत:चेच पोट नीट भरत नाही तर जोडीदाराला काय खाऊ घालू म्हणून लग्नच केले नसल्याची खंत भीमरावने ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.

सुनीता इंगोले पहिल्यांदाच शहरात आल्या आहेत. त्यांचा मुलगा सुमितला पहिलीत प्रवेश मिळाला आहे. वस्तीतील शिकलेल्या तरुण पोरांची अवस्था पाहून त्यांना नुकताच शाळेत जात असलेल्या आपल्या मुलाच्या भविष्याची चिंता लागली आहे. भीक मागायला जावे तर जीव घेता, शिकावे तर नोकरी नाही आणि जातपंचायतीची भीती वेगळीच अशा संकटात आम्ही कसे जगावे, असा सवाल ६५ वर्षांच्या शाहूबाई शिंदे डोळ्यात जीव गोळा करून विचारीत आहेत. भीक मागून शाळा शिकवल्या तरीही बेकारी पाठ सोडेना आणि भीक मागायला गेलेल्या पोरांचा हकनाक बळी जात असेल तर आम्ही जगायचे कसे, हा प्रश्न सतावत असल्याने संपूर्ण वस्तीच दहशतीच्या सावटाखाली आहे.