अलिबाग तालुक्यात मतदारांनी ‘नोटा’अर्थात ‘नकाराधिकारा’चा वापर केल्याने काही प्रमुख उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी ३ हजार ३९ तर पंचायत समितीसाठी ३ हजार २१९ वेळा ‘नोटा’चा वापर केला. ‘नोटा’मुळे पंचायत समितीतील शेकापचे तीन तर काँग्रेसचे दोन उमेदवार पराभूत झाले आहेत.

मापगाव आणि आवास पंचायत समिती गणातही ‘नोटा’ने उमेदवारांना घाम फोडला आहे. आवास पंचायत समितीमधून काँग्रेसच्या सुषमा म्हात्रे २९६ मतांनी पराभूत झाल्या आहेत. तर ‘नोटा’कडे २७७ मते गेली असल्याने निकालाला कलाटणी दिली आहे. मापगाव पंचायत समिती गणातील काँग्रेसच्या उनिता थळे २०३ मतांनी पराभूत झाल्या तर ‘नोटा’साठी ३०५ मते गेली आहेत. सारळ पंचायत समिती गणात नोटामुळे काँग्रेसच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागल्याचे दिसते. येथे शेकापचे प्रकाश पाटील फक्त ३९ मतांनी विजयी झाले. काँग्रेसच्या अमृता नाईक यांचा येथे पराभव झाला. येथे ‘नोटा’साठी १९४ मते आहेत. चेंढरे पंचायत समिती गणात शेकापच्या स्वाती पाटील यांचा फक्त २६ मतांनी पराभव झाला आहे. येथे ‘नोटा’साठी २५० मते गेली आहेत. येथे शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला. खंडाळे पंचायत समिती शिवसेनेच्या पूजा गुरव यांचा २८१ मतांनी पराभव झाला आहे तर ‘नोटा’ची २३८ जणांनी निवड केली. चौल पंचायत समिती गणात शेकापच्या प्रतीक्षा खडपे फक्त १८५ मतांनी पराभूत झाल्या. ‘नोटा’ने येथे २२६ मते घेतली. बेलोशी पंचायत समिती गणातून शेकापच्या गौरी सोनार केवळ ५१ मतांनी पराभूत झाल्या आहेत. येथे ‘नोटा’ला २३८ मते मिळाली आहेत. येथे ‘नोटा’मुळे निकालाला कलाटणी मिळालेली दिसते.

नोटाचा पर्याय असावा की नसावा, असल्यास त्याचा फायदा किती? आणि तोटा किती? याबाबत मतभिन्नता असेलही, मात्र निवडणुकीत मतदारांकडून नोटाचा पर्याय स्वीकारणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राजकीय पक्षांसाठी ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे या नोटाचे करायचे काय? हा विचार करण्याची वेळ राजकीय पक्षांवर आली आहे.