कोंढाणे धरणाला माझा विरोध नाही, मात्र धरणाच्या बांधकामातील अनियमिततेला माझा विरोध असल्याचे आम आदमी पार्टीच्या नेत्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. स्थानिक लोकांचा धरणाला विरोध नसेल आणि ग्रामसभा जर धरणाला मान्यता देत असेल, तर धरण करायला माझी हरकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्या अलिबाग इथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या. २ डिसेंबरला रोहा इथे होणाऱ्या २१ संघटनांच्या रॅलीत मोठय़ा सख्येने सहभागी व्हा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.  
कोंढाणे धरणाला माझा विरोध नाही, पण धरणाच्या बांधकामात झालेली अनियमितता आणि भ्रष्टाचार याला आपला विरोध होता. लोकांना धरण पाहिजे असेल तर ते जरूर व्हावे आणि धरणाचे पाणी स्थानिकांना मिळावे, असेही दमानिया यांनी स्पष्ट केले. कोंढाणे धरणाचा भ्रष्टाचार आपणच काढल्याचा खुलासा त्यांनी या वेळी केला. मी यापूर्वी कधीही सामाजिक कार्यात कार्यरत नव्हते, पण आता मी आम आदमी पक्षाकडून स्वत:ला सामाजिक कार्यात झोकून दिल्याचेही दमानिया यांनी स्पष्ट केले.
येत्या २ डिसेंबरला रोहा इथे मेहंदळे हायस्कूलच्या प्रांगणात जाहीर सभा घेणार असल्याचे दमानिया यांनी सांगितले. या रॅलीत कोकणासह राज्यभरातील २१ संघटना सहभागी होणार आहेत. रॅलीला आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण, कुमार विश्वास, मयांक गांधी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, धर्मराज्य पक्षाचे राजन राजे हे सहभागी होणार आहेत. या रॅलीला शेकापने पाठिंबा जाहीर केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले, मात्र रॅलीतील मान्यवरांच्या स्वागतासाठी शेकाप नेते येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारने नुकतीच सिंचनवरील श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली आहे. ती कशी चुकीची आहे हे दाखवण्यासाठी या रॅलीत सिंचन घोटाळ्याचा ब्लॅक पेपर प्रसिद्ध करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सभेत एक गौप्यस्पोट करणार असल्याचे ही दमानिया यांनी या वेळी सांगितले. त्यामुळे जास्तीत जास्त संघटना आणि पक्षांनी या रॅलीत सहभाग घ्यावा, असे आवाहन दमानिया यांनी केले.