– दत्तात्रय भरोदे

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून शहरी भागासह ग्रामीण भागालाही कोरोनाचा विळखा बसला आहे. कोरोनाचे झपाट्याने वाढणारे संक्रमण आणि आरोग्य सुविधांचा अभाव यामुळे भीतीदायक वातावरण पसरले आहे. शहापूर तालुक्यात दिवसागणिक कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असून बाधितांच्या आकडा तब्बल सात हजार पर्यंत पोहचला आहे. गेल्या महिन्याभरात तर दररोज एक याप्रमाणे मृत्यू झाले असून आत्तापर्यंत २०२ कोरोना रुग्णांना मृत्यूने कवटाळले आहे. विशेष म्हणजे तब्बल साडेपाच हजार बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून दीड हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीतही दिलासा देणारी बाब म्हणजे तालुक्यातील कळभोंडे, शिरवंजे व विहिगाव या तीन ग्रामपंचायतींमध्ये अजूनपर्यंत कोरोनाने शिरकाव केला नसल्याने या तीनही ग्रामपंचायती ग्रीन झोन मध्ये आहेत.

शहापुरसह तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असून रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत यासाठी तालुक्यातील गोठेघर येथील आश्रमशाळेत १६० बेड चे कोविड केअर सेंटर बरोबरच फिवर क्लिनिक व स्वॅब कलेक्शन सेंटरही सुरू करण्यात आले आहे. यामुळे तालुक्यातील बहुतांशी रुग्णांना याचा फायदा होत आहे. मात्र दिवसागणिक वाढणाऱ्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येमुळे येथील आरोग्य यंत्रणेवर ताण पडत असून पुरेशा सुविधांअभावी ग्रामीण जनता भयभीत झाली आहे. परिणामी बहुतांशी रुग्णांना ठाणे, भिवंडी याठिकाणी हलवावे लागत आहे.

शहापूर तालुक्यात ११० ग्रामपंचायती असून सुमारे सात हजार कोरोना बाधित रुग्ण आहेत. यामध्ये सर्वाधिक दीड हजार रुग्ण वासिंद ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात असून आत्तापर्यंत ३७ रुग्ण कोरोनाने दगावले आहेत. त्या खालोखाल आसनगाव – ५५७ रुग्ण असूूून ११ मृत्यू, चेरपोली -४५७ रुग्ण ११ मृत्यू व मोखावणे – ४३७ रुग्ण तर १४ मृत्यू झाले आहेत. विशेष म्हणजे तालुक्यातील कळभोंडे, शिरवंजे व विहिगाव या ग्रामपंचायतींमध्ये अजूनपर्यंत कोरोनाने शिरकाव केला नसल्याने या तीनही ग्रामपंचायती ग्रीन झोन मध्ये आहेत. दरम्यान, कोरोनाचे वाढते संक्रमण घातक असून कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत असले तरी बहुतांशी नागरिकांकडून याबाबत हलगर्जी पणा केला जात असल्याने त्यांच्या जीवावर बेतल्याच्या घटना घडत आहेत. याकडे गांभीर्याने पहाण्याची गरज निर्माण झाली आहे.