महात्मा गांधी जयंतीदिनीच काँग्रेसचे नेते, उद्योगमंत्री नारायण राणे यांनी गांधीगिरी सोडल्याचे जाहीर केले. गेली तीन वर्षे आपण गप्प बसलो त्यामुळे सर्वानीच फायदा घेतला आता गप्प बसणार नाही, असा इशारा राजकीय विरोधकांसह पत्रकारांना सभेत दिला.
काँग्रेसची सभा मळेवाड कोंडुरा या ठिकाणी होती. महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती दिनी प्रथम त्यांना पुष्पांजली वाहण्यात आली. त्यानंतर नारायण राणे बोलत होते. यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष राजन तेली, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, संदेश पारकर, डॉ. जयेंद्र परुळेकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी व पदाधिकारी उपस्थित होते.
आपण गेली तीन वर्षे गप्प होतो, पण कोणीही उठून बोलायला लागले व लिहायला लागले. आता बस्स झाली गांधीगिरी, मी उत्तरे देईन, असे नारायण राणे म्हणाले. सी वर्ल्ड, विमानतळ, गारमेंट प्रकल्प अशा प्रत्येक प्रकल्पाला विरोध सुरू आहे, पण मी असेपर्यंत कोणत्याही प्रकल्पाला विरोध चालणार नाही, प्रकल्प होणारच, असा इशारा राणे यांनी दिला.
या मेळाव्यात विरोधक व पत्रकारांवर टीका करताना राणे यांनी इशाराच दिला. प्रकल्प नको असतील तर बेकारांना पत्रकारांच्या घरी पाठविले जाईल असे त्यांनी सांगून शर्मा, वर्मा चालतात, पण राणे कोणालाही नको. मी संपणार नाही. राज्याच्या राजकारणात पुरून उरलो आहे, असे सांगून राणे यांनी कोणत्याही प्रकल्पात माझी भागीदारी किंवा जमीन नाही असे ठणकावले.
यावेळी प्रवीण भोसले, डॉ. परुळेकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी व इतरांनी मार्गदर्शन केले.