राज्यात भाजप मजबुत करण्यावर आपला भर असून मुख्यमंत्रीपदासाठी आपण अद्याप परिपक्व नसल्याचे स्पष्टीकरण आ. पंकजा मुंडे यांनी दिले. दुसऱ्या टप्प्यातील संघर्ष यात्रा नाशिक येथे दाखल झाल्यानंतर शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. महिला मुख्यमंत्री म्हणून पंकजा चांगले काम करू शकतात, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी म्हटले होते. त्यावर मुंडे यांनी त्या विधानाला विनोद म्हणत मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत आपण नसल्याचे सांगितले.
प्रदीर्घ काळापासून राज्यात सत्तेवर असलेल्या काँग्रेस आघाडीकडून भरीव विकास कामांचा दावा केला जात आहे. परंतु, या शासन काळात जितकी कामे झाली नाहीत, त्यापेक्षा अधिक घोटाळे झाल्याचा आरोप मुंडे यांनी केला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस आघाडीला भ्रष्टाचार, बेरोजगारी या मुद्यांवरून घेरले जाणार आहे. यावेळी त्यांनी लोकसभा ऐवजी आपला कल विधानसभा निवडणूक लढण्याकडे असल्याचे सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या आधी लोकसभेची पोटनिवडणूक झाली असती तर आपण ती लढविली असती. असे त्यांनी स्पष्ट केले.