उद्धव ठाकरे यांचे स्पष्टीकरण; शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेची घोषणा
मराठवाडय़ात मुलीच्या लग्नाच्या विवंचनेने शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागू नयेत म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना शिवसेनेच्या वतीने लागू करीत आहे, अशी घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी परभणीत केली. सरकार पाडणे किंवा पडणे ही शिवसेनेची प्राथमिकता नाही, असा टोला त्यांनी अप्रत्यक्षपणे मध्यावधीचे भाकीत करणाऱ्या शरद पवार यांना लगावला.
जिल्ह्यातील ५० आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना तीन शेळय़ा व राखणावळीचे पाच हजार रुपये, तर दुष्काळातील ३६० शेतकऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये मदत शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. ठाकरे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दुष्काळग्रस्त शेतकरी व ५ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीचे वाटप करण्यात आले.
ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच राज्यात सरकारबाबत उडणाऱ्या वावडय़ा व पवारांनी मध्यावधी निवडणुकीचे केलेले भाकीत यावर बोलताना शिवसेनेची सरकार पाडणे किंवा पडणे ही प्राथमिकता नाही असे स्पष्ट केले. अधिकारी हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे ऐकत नाहीत या अगतिकतेवर ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना सरकारी भाषा समजत नसेल तर शिवसेनेला आपल्या स्टाईलप्रमाणे काम करावे लागेल, असे ठणकावले. मराठवाडय़ात नसíगक आपत्तीमुळे मोठे संकट आले आहे. दुष्काळाची भयानक परिस्थिती आहे. शासनाने दुष्काळ जाहीर करताना काही उपाययोजना सुचवल्या आहेत. त्या उपाययोजनांचा लाभ प्रत्यक्ष जनतेपर्यंत पोहोचला का, हे पाहण्यासाठी शिवसेनेचे सर्व मंत्री व आमदार मराठवाडय़ात फिरत आहेत. शिवसेना सत्तेत असल्यामुळे आम्ही बसलो नाहीत. गावोगावी जाऊन शेतकऱ्यांच्या अडीअडचणी आमदार समजून घेत आहेत. निव्वळ चिखलफेक करणे आमचे काम नाही, असे ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले.
मराठवाडय़ातील साडेचार लाख विद्यार्थ्यांना मोफत पास देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला असे त्यांनी सांगितले.

जिथे शासन कमी, तिथे आम्ही – कदम
तुमच्या हाकेला ओ देणारे व दुष्काळग्रस्ताच्या मदतीला धावून येणारे उद्धव ठाकरे हे एकमेव नेते आहेत, असे गौरवोद्गार पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी काढले. जिथे शासन कमी, तिथे आम्ही ही भूमिका घेऊन ठाकरे परभणीत आले आहेत, असेही ते म्हणाले. शिवसेना वगळता इतर राजकीय पक्षांचे लोक हात हलवत आले व हात हलवत परत गेले, अशी टीका कदम यांनी केली.

विवाहाचा खर्च सेनेचा
बहुतांश शेतकरी मुलीच्या लग्नाच्या विवंचनेत आत्महत्या करीत आहेत, पण भविष्यात मुलीच्या लग्नासाठी शेतकऱ्यांनी जीवन संपवू नये, यासाठी ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना’ सुरू करीत आहोत. त्याची नोंदणी सुरू झाली असून, सोयरीक तुम्ही जुळवा, लग्नाचा खर्च शिवसेना करेल, असे त्यांनी सांगितले.