जनुकीय सुधारित बियाणांबाबत पद्मश्री पुरस्कारप्राप्त शेतीतज्ज्ञ डॉ. सुभाष पाळेकर यांचे मत

अमरावती : जनुकीय सुधारित बियाणे जाणूनबुजून कापूस उत्पादकांना जास्त गुंतवणूक खर्चासह रासायनिक शेती करण्यास बाध्य करते.  त्यामुळे  शेतकरी  बँका आणि सावकारी कर्जाच्या बोजाखाली येतो. दुसरीकडे, दरवर्षी कर्जमाफीची मागणी पूर्ण करणे कोणत्याही सरकारला शक्य नाही. ‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती’च्या माध्यमातून अधिक उत्पादन घेतले जाऊ शकते. आम्ही कुठल्याही तंत्रज्ञानाविरुद्ध नव्हे तर कोणत्याही जनुकीय सुधारित बियाण्यांच्या घातक विध्वंसक घटकांच्या विरोधात आहोत, असे मत पद्मश्री पुरस्कारप्राप्त शेतीतज्ज्ञ डॉ. सुभाष पाळेकर यांनी व्यक्त केले आहे.

‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीत’ देशी बियाणे, सुधारित बियाणे आणि बीटी कापसाच्या दुसऱ्या पिढीतील एफ-२ बियाणांचाही वापर केला जात आहे. रासायनिक शेतीतून उगवल्या जाणाऱ्या बीटी कापसाच्या तुलनेत अधिक उत्पादन यातून मिळत आहे.  पाळेकर नैसर्गिक शेती तंत्रज्ञानाच्या अंतर्गत स्थानिक किंवा सुधारित कापूस जाती रासायनिकदृष्टय़ा उगवलेल्या बीटी कापूस बियाण्यांपेक्षा समान किंवा जास्त उत्पादन देत असतील तर आम्हाला बाजारातून खरेदी केलेले बीटी कापूस बियाणे पेरणे आवश्यक आहे का? असा सवाल पाळेकर यांनी केला आहे.

आज हजारो कापूस उत्पादक शेतकरी ‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीचा’ अवलंब करताना बाजारातील बीटी बियाणे वापरून देखील रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशीनाशके न देता रासायनिक शेतीतील बीटी कापूस पिकापेक्षा जास्त उत्पादन घेत आहेत.

आपल्याकडे पाळेकर नैसर्गिक शेती अंतर्गत स्थानिक किंवा सुधारित कापूस जातींचा वापर करण्याचा पर्याय उपलब्ध आहे, परंतु स्थानिक बियाणे किंवा सुधारित बियाणे उपलब्ध नसल्यास, पाळेकर नैसर्गिक शेती अंतर्गत संकरित कापूस बियाणे घ्या.  परंतु स्थानिक किंवा सुधारित किंवा हायब्रिड कापूस बियाणे देखील उपलब्ध नसल्यास नैसर्गिक शेती अंतर्गतच बीटी कापूस बियाण्यापासून तयार केलेल्या दुसऱ्या पिढीच्या एफ-२ बियाणांची लागवड केली जाऊ शकते. परंतु, ही सर्व स्थानिक सुधारित, संकरित आणि एफ-२ बीटी बियाणी उपलब्ध नसल्यास या आपत्कालीन परिस्थितीत शेतकरी बाजारातून बीटी कापूस बियाणे खरेदी करू शकतात. फक्त पाळेकर नैसर्गिक शेती अंतर्गतच गेल्यावर्षी मराठवाडा, विदर्भात याच बियाण्यांपासून रासायनिक शेतीपेक्षा जास्त उत्पादन दिले आहे, असा दावा पाळेकर यांनी केला आहे.

सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीची चळवळ कोणत्याही रचनात्मक चांगल्या तंत्रज्ञानाविरुद्ध नाही. आम्ही केवळ कोणत्याही तंत्रज्ञानाच्या विनाशकारी भागाच्या विरोधात आहोत. भारतीय संवैधानिक बंधनाखाली आपले काम करणाऱ्या कोणत्याही बहुराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय कंपन्यांविरुद्ध आम्ही नाही, हेही डॉ. पाळेकर यांनी स्पष्ट केले आहे.

पाळेकर नैसर्गिक शेतीच्या पद्धतीतून आम्ही जीएम तंत्रज्ञानाचा विनाशकारी भाग टाळू शकतो. जनुकीय सुधारित बियाण्यांचे  प्रचारक बीटी कपाशीमुळे जमिनीचा बिघडलेला पोत, पाणी आणि पर्यावरणाचा ऱ्हास या विषयावर का बोलत नाहीत, याचे आपल्याला आश्चर्य वाटते. बीटी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या, ग्रामीण युवकांचे शहराकडे होणारे स्थलांतर, कर्करोग आणि हृदयरोगामुळे लोकांचे होणारे मृत्यू, जागतिक तापमानवाढ, वातावरणातील बदल आणि नैसर्गिक स्रोतांचा ऱ्हास याचे समर्थन हे लोक करणार का, असे डॉ. पाळेकर यांचे म्हणणे आहे.