जिल्ह्यातील प्रशासनाला साधनसामग्री घेणे, रिक्त पदे भरणे, निधी खर्च करणे याबाबत अधिकार दिले आहेत. त्यामुळे आता प्रशासनाकडून कुठलीही चूक सहन केली जाणार नाही. जळगावचा मृत्युदर कमी होऊन आता जळगाव कोविडमुक्त झाले पाहिजे, अशी अपेक्षा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यात करोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. जिल्ह्यातील करोनाचा मृत्यूदर हा राज्यात सर्वाधिक असल्याने जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी टोपे यांनी बुधवारी येथे भेट दिली. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना प्रशासकीय यंत्रणेला सावधगिरीचा इशारा दिला. संसर्ग थांबविण्यासाठी त्रिस्तरीय रचना करण्यात आली आहे. यात सव्‍‌र्हे बिनचूक करणे, तपासणी अहवाल ४८ तासात आलाच पाहिजे, असे न झाल्यास जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक जबाबदार राहतील, असा इशाराही त्यांनी दिला. मुंबईच्या कृती दलाचा सल्ला जळगावच्या डॉक्टरांनी घेतला पाहिजे. आयएमए संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी  कोविड रुग्णालयात सेवा वाढवली पाहिजे. तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयांमधील रिक्त पदे जिल्हाधिकाऱ्यांनी भरण्याचे आदेश दिले आहेत.

शहरात मनपा रुग्णालयातील रिक्त पदेही भरावीत. खासगी दवाखान्यांनी रुग्णांना सेवा दिली पाहिजे. जे दवाखाने बंद आहेत, त्यांचे परवाने रद्द करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. ‘वॉर रूम’ जिल्हाधिकारी कार्यालयात असेल. तेथे जिल्ह्याची सर्व माहिती येणे आवश्यक आहे. होणाऱ्या मृत्यूची ‘डेथ ऑडिट कमिटी’ चौकशी करेल, असेही टोपे यांनी सांगितले.

करोना संशयितांचे अहवाल तपासण्यासाठी खासगी प्रयोगशाळांचे शुल्क कमी करण्यासाठी डॉ. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सर्व उपचार मोफत होतील. शहरात ३३ दवाखान्यात ही योजना आहे. तेथे त्यासंदर्भातील फलक लिहिणे आणि आरोग्यमित्र असणे बंधनकारक आहे. असे नसेल तर जिल्हाधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे अधिकार आहेत. आयएमएच्या डॉक्टरांनी स्वत: संच खरेदी करून रुग्ण तपासावेत. नाकारल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा टोपे यांनी दिला.

जिल्हा प्रशासकीय यंत्रणेत बदलाचे संकेत

जिल्ह्यातील करोनाचा मृत्यूदर हा राज्यात सर्वाधिक आहे. हा मृत्यूदर रोखण्यासाठी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेत काही मोठी ‘ऑपरेशन’ करावी लागणार आहेत. त्यासाठीच आपण जळगावात आलो आहोत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगत प्रशासकीय यंत्रणेत बदलाचे संकेत दिले. सकाळी १०.३० वाजता टोपे यांचे शासकीय विश्रामगृहात आगमन झाले. त्याठिकाणी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांसह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी टोपे यांना विविध संस्थांतर्फे निवेदने देण्यात आली. यावेळी टोपे यांनी जळगाव जिल्ह्यात करोनाची स्थिती गंभीर असल्याचे सांगितले.

शासन गंभीर नाही- गिरीश महाजन

शासनाला करोना रुग्णांविषयी कसलेही गांभीर्य नाही. कोविड रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ८० रुग्णांचे अहवाल सापडत नाही. ही गंभीर बाब आहे. हा प्रशासनाचा असमन्वय दाखवितो,  असा आरोप माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केला. आरोग्य मंत्री टोपे यांच्या उपस्थितीत बुधवारी जळगाव येथे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. प्रशासनाचा एकमेकांशी कसलाही ताळमेळ नाही. डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात कोविड केंद्र हलविण्याचे टोपेंनी सांगितले. परंतु, हे ठिकाण शहरापासून १८ किलोमीटर दूर असल्याने रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोयच होणार आहे. मंत्र्यांनी कागदोपत्री नव्हे, वस्तुनिष्ठ माहितीवर बोलले पाहिजे, असे महाजन यांनी सांगितले.