राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांची नाराजी दूर झाली आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज झाले होते. ते आमदाराकीचा राजीनामा देण्याच्याही तयारीत होते. मात्र त्यांना आज मुंबईत बोलवण्यात आलं. मुंबईत त्यांच्याशी जयंत पाटील, धनंजय मुंडे, अजित पवार यांनी चर्चा केली. शरद पवार यांनीही सोळंके यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. ज्यानंतर पत्रकारांशी बोलताना माझी नाराजी दूर झाली असून राजीनामा देणार नसल्याचं सोळंके यांनी जाहीर केलं.

मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर अनेकांची नाराजी समोर आली. त्यापैकी एक राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंकेही होते. मंत्रिपद न मिळाल्याने राजीनामा देणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं होतं. मात्र आज जयंत पाटील, अजित पवार धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी माझा विचार बदलला. मी आता आमदारकीचा राजीनामा देणार नाही. मला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी नाराज झालो नव्हतो. मात्र काही प्रमाणत जी नाराजी होती ती आता दूर झाली आहे. सगळ्यांशी चर्चा झाली आहे, शरद पवार यांनीही माझ्याशी फोनवरुन चर्चा केली. मी आता नाराज नाही असंही सोळंके यांनी म्हटलं आहे.