ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ. कृष्णा किरवले यांच्या हत्येची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. आठवले यांनी आज, कोल्हापुरात डॉ. किरवले यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ही मागणी केली.

डॉ. कृष्णा किरवले यांची काल, शुक्रवारी हत्या झाली होती. किरवले हे म्हाडा कॉलनीत राहत होते. त्यांच्या हत्येनंतर राज्यभरातून विविध स्तरांतून त्यांच्या हत्येचा निषेध करण्यात येत आहे. सुतारकाम करणाऱ्या व्यक्तीने क्षुल्लक कारणातून किरवले यांची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. त्यानंतर आज पोलिसांनी डॉ. किरवले यांच्या हत्येप्रकरणी शाहुपुरी परिसरातून संशयित आरोपीला अटक केली आहे, असे वृत्त आहे. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज, शनिवारी कोल्हापुरातील त्यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. किरवले यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. किरवले यांच्या हत्येची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. रामदास आठवले यांनी कालही किरवले यांच्या हत्येच्या घटनेचा तीव्र निषेध केला होता. किरवले यांच्या हत्येची सखोल चौकशी करून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही किरवलेंच्या हत्येच्या घटनेचा निषेध केला होता. घटनेची सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. तर किरवले यांच्या हत्येबाबत पोलिसांकडून सर्व शक्यता गृहीत धरून तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले होते.

आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक आणि कार्यकर्ते असलेल्या डॉ. कृष्णा किरवले यांच्या हत्येचा निषेध सर्व स्तरांतून केला जात आहे. शिवाजी विद्यापीठाजवळ असलेल्या किरवले यांच्या घरात त्यांच्यावर चाकून हल्ला करण्यात आला होता. शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागाचे प्रमुख आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेंटर फॉर रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंटचे प्रमुख अशी पदे किरवले यांनी भूषवली होती. काही महिन्यांपूर्वीच ते विद्यापीठातून निवृत्त झाले होते.