आमदार दादाराव केचे यांनी आज (रविवारी) त्यांच्या वाढदिवशी जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रशासनाने दिलेली नोटीस पोलीसांच्या गावीही नसल्याची धक्कादायी बाब उघडकीस आली आहे.

आमदार केचे यांनी वाढदिवसानिमित्य गरजूंना धान्य वाटपाचा कार्यक्रम आयोजीत  केला होता. त्यामुळे त्यांच्या घरापूढे एकच गरजू नागरिकांची झुंबड उडाल्यावर समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. अखेर पोलिसांना जमाव पांगवावा लागला. या संदर्भात शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख बाळा जगताप यांनी तक्रार केल्यावर उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक यांनी चौकशी करण्याचे आदेश आर्वी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले.

साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, फौजदारी प्रक्रिया संहिता, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम व भारतीय दंड संहिता या अंतर्गत विविध कलमानूसार कारवाई करण्याचेही सूचना केली होती. घटनास्थळी आर्वीचे ठाणेदार उपस्थित असल्याने त्यांना याची पूरेपूर कल्पना आहे. करोना विषाणूचा प्रसार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या गर्दीने आदेशाचे उल्लंघन झाले असल्याचे सूचनेत नमूद आहे. या अनुषंगाने कारवाई करून जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे सूचविण्यात आले.

मात्र अशी नोटीस प्राप्तच झाली नसल्याचे सांगण्यात आले. आर्वी उपविभागीय पोलीस अधिकारी मैराळे यांना याबाबत विचारणा केल्यावर त्यांनी अशी काही नोटीस प्राप्तच झाली नसल्याचे संगितले. दिवसभर बाहेरच असल्याने माहिती घेवून सांगू, असे त्यांनी सायंकाळी उशीरा सांगितले. याबाबत उपविभागीय अधिकारी धार्मिक यांना विचारणा केल्यावर ते म्हणाले की आपण सुरूवातीला व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून त्वरीत नोटीस पाठविली. त्यानंतर काहीच वेळात लेखी तक्रार पोलीसांकडे दिली. त्याची पोच आपल्याकडे आहे, असे धार्मिक यांनी स्पष्ट केले. महसूल व पोलीस प्रशासनाच्या अशा विसंवादामूळे नागरिकांमध्ये वेगळी चर्चा रंगू लागली आहे.