काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना प्राप्तिकर विभागाने गेल्या दहा वर्षांतील संपत्ती विवरण घेऊन स्वत: उपस्थित राहण्याची नोटीस बजावली आहे. या नोटीशीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना अशा नोटीसा पाठवल्या जात असून आपण त्याला उत्तर देऊ अशी माहिती चव्हाण यांनी बुधवारी कराड येथे माध्यमांशी बोलताना दिली.

चव्हाण म्हणाले की, दिवाळीच्या मुहूर्तावर नरेंद्र मोदी सरकारच्या प्राप्तिकर विभागाने आपल्याला पाठवलेल्या नोटीशीवर २१ दिवसात खुलासा करावयाचा आहे. तरी, आपण लवकरच या नोटिशीला रितसर उत्तर देऊ. ही नोटीस म्हणजे प्राप्तिकर विभागाच्या नियमित प्रक्रियेचा भागही असावा असे नमूद करताना, चव्हाण यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि भाजपवर कोरडे ओढले. सत्तेचा वापर कसा करायचा, तो कोणासाठी करायचा याची भाजपने नियोजनबध्द व्यूहरचना केली आहे. त्यानुसारच सर्वकाही सुरू आहे. अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही अशीच नोटीस पाठवली गेली. विरोधी पक्षाच्या नेत्यांना नोटीसा पाठवल्या जात असल्या तरी भाजपच्या कोणाला अशी नोटीस पाठवल्याचे आपल्या निदर्शनास आले नसल्याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले.