राष्ट्रवादीबरोबर घरोबा केला म्हणून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आत्मक्लेष आंदोलनामुळे नेत्यांची कुचंबणा झाली. आता आंदोलकांना समज देऊन यापुढे पक्षनेतृत्वाशी चर्चा करुन निर्णय घेण्यास सुचविले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने शिवसेनेची युती तोडून राष्ट्रवादीशी घरोबा केल्याने भारतीय जनता पक्षाचे सुनिल मुथा, ज्येष्ठ नेते हेरंब औटी, संजय पांडे, शम्मीकुमार गुलाटी, किरण लुणीया, वैभव मुळे, कुमार जंगम यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी पुतळ्यासमोर एक दिवस आत्मक्लेष आंदोलन केले होते. त्याची दखल पक्षनेतृत्वाने घेतली.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुथा यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा केली. भाजपने कुणाचाही अधिकृत पाठिंबा घेतलेला नाही. निवडणुकीत मतदान हे पक्षाचे कार्यकर्ते करतात. तसेच अनेक प्रकारचे पक्षाशी संबंध नसल्याने लोक करतात. लोकशाहीत त्यांचे मतदान नाकारले जात नाही. राष्ट्रवादीने पाठिंबा स्वत:हन देऊ केला, तो भाजपाने मागितला नाही. त्यांना मंत्रीपद किंवा सत्तेत सहभागी करुन घेतलेले नाही त्यामुळे विनाकारण पक्ष कार्यकर्त्यांनी गैरसमज करुन घेऊ नये, असे मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या त्यागातून सत्ता आली आहे. आता सरकारला निर्णय घेण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार झाले पाहिजे. पक्ष कार्यकर्त्यांनी आधी नेतृत्वाशी चर्चा करावी मगच निर्णय घ्यावा. केवळ राग व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर आंदोलने करणे योग्य नाही, अशी समज मनगुंटीवार यांनी मुथा यांना दिली. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस शाम जाजू यांनीही मुथा यांच्याशी चर्चा केली. पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी निर्णय घेतले आहेत. पक्षाचे धोरणे हे कार्यकर्त्यांनी स्विकारले पाहिजे ते कार्यकर्त्यांना चूक वाटत असेल तरी नेतृत्वाने धोरणात्मक निर्णय विचार करुन घेतलेला असतो. त्यामागे पक्षहीत असते. ते आज चुकीचे वाटत असले तरी भविष्यासाठी योग्य आहे, असे जाजू यांनी सांगत आंदोलनाबाबत नाराजी व्यक्त केली.