निधी वेळेवर उचलला, मात्र कामे मुदतीत पूर्ण न केल्याचा प्रकार औंढा नागनाथ तालुक्यात घडला आहे. त्यामुळे तालुक्यातील गोजेगावचे सरपंच शिवप्रसाद सांगळे, धारचे गणेशगिर नरूके, चिमेगावचे विष्णू दराडे व पारडी सावळीचे सरपंच दामोधर गिते यांना नोटीस बजावण्यात आली आहे. ग्रा. पं. खात्यातील रकमेच्या अपहाराची रक्कम न भरल्यास फौजदारी खटला दाखल का करू नये, अशी विचारणा नोटिशीत केली आहे.
जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही नोटीस बजावली आहे. ग्रामपंचायतीअंतर्गत विविध कामांसाठी निधीची उचल करून कामे न करता कर्तव्यात कसूर केला व पदाचा दुरुपयोग करून निधीचा अपहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे. गोजेगाव ग्रामपंचायत अंतर्गत रस्ता, अंगणवाडी दुरूस्ती, सार्वजनिक शौचालय, सांडपाणी व्यवस्थापन व सिमेंट रस्ता या साठी दिलेल्या ६ लाखांपकी २ लाख ४० हजार रुपयांची उचल करून प्रत्यक्षात कोणतीच कामे केली नाहीत, उलट ५ लाख ८० हजार ८०० रुपयांची तफावत दाखवून संबंधित ग्रामसेवक व सरपंच यांच्या संयुक्त खात्यातील रकमेचा अपहार झाला. सरपंच सांगळे यांच्याकडून २ लाख ९० हजार ४०० रुपये, तर ग्रामसेवक एस. बी. गिरी यांच्या खात्यावर २ लाख ९० हजार ४०० अशी अपहाराची रक्कम दाखविली आहे. सरपंच व ग्रामसेवक यांच्या बँकेतील संयुक्त खात्यातील रक्कम संगनमत करून काढून घेत ५ लाख ८० हजार ८०० रकमेचा अपहार केल्याचे पं. स.चे गटविकास अधिकारी यांनी चौकशी अहवालात म्हटले आहे. धार, चिमेगाव व पारडी सावळी येथेही सरपंच व ग्रामसेवक यांच्या संयुक्त बँक खात्यातून रकमा उचलून अपहार केल्याचा ठपका ठेवला आहे.