कृष्णा नदी प्रदूषणप्रकरणी प्रदूषण नियंत्रण महामंडळाने किसन वीर आणि कृष्णा साखर कारखान्यास कारखाना बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गाळप पूर्ण होण्यापूर्वी कारखाना बंद करण्यास विरोध दर्शविला आहे.
    कृष्णा नदीत अनेक मासे मृत झाल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही बाब प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्याप्रमाणे प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी किसन वीर साखर कारखाना परिसरास भेट दिली असता (दि ११मे) कारखान्याच्या जैविक खत प्रकल्पात पावसाचे पाणी मिसळून या पाण्याबरोबर आसवणी शेष (बगॅस )चिंधवली येथील नाल्याव्दारे (ता वाई )कृष्णा नदीत मिसळत असल्याने तेथून पुढे नदीच्या पाण्यातील मासे मृत्युमुखी पडत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. ही बाब प्रथम िलब गोवे (ता सातारा) येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली. टँकरव्दारे आसवणी शेष वाहून नेऊन आजूबाजूच्या परिसरात पसरला जात असल्याचेही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. तर प्रेसमड आजूबाजूला पसरला असल्याचेही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.
    कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे सांडपाणी खुबी नाल्याव्दारे कृष्णा नदीत मिसळत असल्याचेही व यामुळे बहे (सांगली) बंधाऱ्यातील मासे मृत्युमुखी पडल्याची घटना दि १४ मे राजी निदर्शनास आली म्हणून महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे यांनी या दोन्ही साखर कारखान्यांना ७२ तासांची अल्पकाळाची नोटीस देऊन कारखाने बंद करण्याच्या आदेश दिला. कारखाने सुरू ठेवल्यास या कारखान्यांचे पाणी आणि वीजपुरवठा तोडण्यात येईल असेही या नोटिसीत स्पष्ट करण्यात आले आहे.
याबाबत किसन वीर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक विजय वाबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदरचे वृत्त चुकीचे असल्याचे सांगितले. चिधवली येथे काही पाणी नदीत मिसळत असते, परंतु हा प्रकार चिंधवली पुढे खडकी, मर्ढे, आनेवाडी येथे नदी पात्रात झालेला नाही तर लिब गोवे येथे झालेला आहे. त्यापुढे नदीच्या पाण्यात मासे मृत झालेले आढळले नाहीत. मासेमारी करणाऱ्यांनी जिलेटीन अथवा अन्य द्रावण वापरल्याने त्या ठिकाणी नदीच्या पाण्यातील मासे मृत झाले असावेत. तरीही किसन वीरने कृष्णा नदीतील पाण्याचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी पाठविले आहेत. उद्या प्रदूषण नियंत्रण मंडळात याची सुनावणी आहे. तेथे आम्ही योग्य ते उत्तर देऊ. कारखाना बंद करण्यास शेतकऱ्यांनीच विरोध केला असून गळीत पूर्ण झाल्याशिवाय कारखाना बंद करण्यास ऊस उत्पादकांनी विरोध दर्शविला आहे.