परभणी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांच्या विरोधात जिल्ह्यात राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांनी काम केले. या पक्षद्रोहाची गंभीर दखल राष्ट्रवादीने घेतली असून जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना पक्ष सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी नोटिसा बजावल्या आहेत. विशेष म्हणजे पक्षविरोधी काम केल्याचा ठपका राज्यमंत्री फौजिया खान यांच्यावरच ठेवला असून, ७ मे पर्यंत लेखी खुलासा व स्पष्टीकरण करावे, असे नोटिशीत बजावले आहे. दरम्यान, पक्षविरोधी कारवायांचा ठपका राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांवरही ठेवण्यात आल्याचे कळते. तथापि त्यांना बजावलेल्या नोटिशीची प्रत उपलब्ध होऊ शकली नाही.
गर्जे यांच्या सहीने राष्ट्रवादीने हे पत्र श्रीमती खान यांना देण्यात आले. ‘माहितीस्तव’ पत्राची प्रत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही दिली आहे. भांबळे हे पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवित होते. आपण पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार व काम न करता विरोधी उमेदवाराचे काम केले. तसेच तहसिन अहमद खान यांनी उघडपणे बसप उमेदवाराचे काम केले. मानवत येथील इलियास मणियार या कार्यकर्त्यांस भारिप-बहुजन महासंघाची उमेदवारी मिळवून देण्यास मदत केली. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची मते कमी कशी होतील, या साठी आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले, या बाबत सर्व माहिती प्रदेश कार्यालयाला प्राप्त झाली आहे, असे पक्षाच्या वतीने श्रीमती खान यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.
लोकशाही प्रणाली असलेल्या देशाची सूत्रे व्यक्तिकेंद्रित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या, तसेच धार्मिक, सामाजिक व निधर्मी विचार धोरणास मारक ठरण्याची शक्यता असताना आपण व आपल्या सहकाऱ्यांनी पक्षविरोधी काम केले, ही बाब गंभीर आहे. आपले कृत्य पक्षविरोधी, पक्षशिस्तीचा भंग करणारे आहे, असा ठपका खान यांना पाठविलेल्या नोटिशीत ठेवला आहे. प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्या सूचनेनुसार पाठविलेल्या या पत्राबाबत येत्या ७ मे पर्यंत लेखी खुलासा व स्पष्टीकरण द्यावे, असे खान यांना नोटिशीत म्हटले आहे. ३० एप्रिलला जावक क्रमांक २५६ नुसार हे पत्र खान यांना पाठविण्यात आले. दरम्यान या संदर्भात श्रीमती खान यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्या प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकल्या नाहीत.