आवश्यक असणारी परवानगी न घेतलेल्या शहर व उपनगरातील सुमारे ९० सार्वजनिक गणेश मंडळांना महानगरपालिका नोटिसा बजावणार आहे. शुक्रवारी ही कारवाई होण्याची शक्यता आहे, असे समजते.
मनपाच्या सूत्रांनी ही माहिती दिली. गुरुवारी सायंकाळी या नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यंदा सार्वजनिक उत्सवावर अनेक र्निबध घालण्यात आले आहेत. काही अंशी त्याची अंमलबजावणीही झाली आहे. मात्र अनेक गणेश मंडळांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांच्यावर आता कारवाईची चिन्हे आहेत.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली याबाबत समिती नेमली होती. या समितीत मनपा अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. मागदर्शक सूचनांनुसार या समितीने शहर व उपनगरातील गणेश मंडळांचे सर्वेक्षण पूर्ण केले असून त्याचा अहवाल मनपा आयुक्तांना बुधवारी प्राप्त झाल्याचे समजते. या सर्वेक्षणानुसार शहर व उपनगरांमधील सुमारे ९० सार्वजनिक मंडळांनी कोणतीच परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट झाले. या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात येणार असून शुक्रवारी सकाळीच ही कारवाई करण्यात येईल. या मंडळांना त्यावर २४ तासांत म्हणणे सादर करावे लागणार आहे.
मनपाची परवानगी न घेता मांडव टाकून उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केले, मनपाच्या सार्वजनिक जागेवर विनापरवानगी मांडव टाकून रहदारीला अडथळा निर्माण केला अशा कारणांनी या नोटिसा बजावण्यात येणार असून संबंधित मंडळांनी त्यावर म्हणणे सादर केल्यानंतर उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे मनपा सूत्रांनी स्पष्ट केले.