महापालिका क्षेत्रात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आल्यानंतर जाग आलेल्या महापालिकेने रुग्णांबाबत तत्काळ माहिती दिली नाही म्हणून शहरातील ३५० डॉक्टरांना नोटिसा बजावल्या आहेत. गेल्या ११ महिन्यांत महापालिका क्षेत्रात या आजाराने ६ जणांचा बळी गेला असून खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांची माहिती घेऊन उपाययोजना करण्यास आरोग्य विभाग सतर्क करण्यात आला आहे.
महापालिका क्षेत्रात स्वाइन फ्लू बाबत महापौर विवेक कांबळे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची बठक घेतली. या बठकीनंतर त्यांनी सांगितले, की आरोग्य विभाग सतर्क करण्यात आला असून याबाबत लोकांत जागृती करण्यात येत आहे. शहरात या आजाराचे १७ संशयित रुग्ण आढळून आले असून यातील ७ जणांचा वैद्यकीय तपासणी अहवाल सकारात्मक आल्याने गांभीर्य वाढले आहे. यापकी ६ जणांचा मृत्यू गेल्या दोन महिन्यांत झाला आहे.
या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी प्रतिबंधक उपचार सुरू करण्यात आले असून माहिती पत्रकाच्या माध्यमातून नागरिकांना जागृत केले जात आहे. शहरात ५० हजार माहिती पत्रकांचे वितरण करण्यात येत आहे. तसेच या आजारावरील उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाला माहिती देणे बंधनकारक असताना शहरातील काही खाजगी डॉक्टरांनी माहिती दिली नाही. अशा ३५० डॉक्टरांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.