कायम विनाअनुदानित तत्त्वावर सुरू झालेल्या शाळांचा कायम शब्द वगळल्यानंतर, पात्र ठरलेल्या जिल्ह्य़ातील ३३ माध्यमिक शाळांना व प्राथमिकच्या (५ वी ते ७ वी) ३७ तुकडय़ांना शालेय शिक्षण विभागाने यंदापासून अनुदान सुरू केले आहे. यामुळे या शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक, लिपिक, शिपाई आदी सुमारे २५८ पदांवरील कर्मचा-यांना आता या अनुदानाप्रमाणे वेतन मिळेल.
जिल्ह्य़ातील ११८ कायम विनाअनुदानित शाळांपैकी, कायम शब्द काढल्यानंतर अनुदानासाठी ९५ शाळांची तपासणी करून मूल्यांकन करण्यात आले होते. ५५ शाळा अनुदानासाठी अपात्र ठरल्या. राज्य सरकारने सन २००१ पासून कायम विनाअनुदानित तत्त्व शाळांसाठी सुरू केले. राज्यात इंग्रजी वगळता सुमारे २ हजार प्राथमिक व २ हजार माध्यमिक शाळांना या तत्त्वानुसार परवानगी देण्यात आली होती. त्यात नगर जिल्ह्य़ातील ११८ शाळांचा समावेश होता. वारंवार मागणी झाल्यानंतर सन २००९ मध्ये सरकारने कायम शब्द वगळला. त्यांना अनुदान देण्यासाठी सन २०१२-१३ पासून मूल्यांकन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मूल्यांकनानुसार तपासणी करण्यासाठी तीनदा संधी देण्यात आल्या आहेत. पहिल्या संधीत जिल्ह्य़ातील केवळ ७ शाळा अनुदानास पात्र ठरल्या. उर्वरित शाळांना त्रुटींची पूर्तता करण्यासाठी सवलत देण्यात आली होती. त्यानुसार आता ३३ माध्यमिकच्या (८ वी ते १० वी) शाळांना व प्राथमिकच्या (५ वी ते ७ वी) १२ शाळांतील प्रत्येकी एका वर्गास व एका प्राथमिकच्या शाळेतील एका वर्गास अनुदान सुरू करण्याचा आदेश १ मार्चला सरकारने काढला. या शाळांना पात्र ठरलेल्या वर्षांपासून, पहिल्या वर्षी २० टक्के व नंतरच्या प्रत्येक वर्षांत ४०, ६०, ८० व १०० टक्के अनुदान पाच वर्षांत मिळणार आहे. मागासवर्गीयांची पदे न भरल्याने बहुतेक शाळा अपात्र ठरल्या.
नगर शहरातील केवळ आनंद विद्यालय व विश्वंभरदास नय्यर विद्यालय या दोन माध्यमिक शाळा पात्र ठरल्या आहेत. अकोलेतील प्रत्येकी १, पारनेर, श्रीरामपूर, कर्जत, श्रीगोंदे, शेवगाव व संगमनेरमधील प्रत्येकी २, नगर तालुका, कोपरगाव, नेवासेतील प्रत्येकी ३, पाथर्डीतील ४ शाळा पात्र ठरल्या आहेत. राहत्यातील एकही शाळा पात्र ठरली नाही. सरकारने अनुदान पात्रतेसाठी लागू केलेल्या जाचक अटी शिथिल करून गेल्या अनेक वर्षांपासून शाळांवर काम करणा-या शिक्षक व कर्मचा-यांना न्याय द्यावा, अशी प्रतिक्रिया माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील पंडित यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.