शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांच्या सोयीसाठी श्री साईबाबा संस्थानने ई-रेल्वे तिकीट आरक्षणाबरोबरच दर्शनासाठीचे तिकीट आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. रेल्वेच्या आयआरसीटीसीच्या (IRCTC) वेबसाईटवरुन ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल हे शिर्डी येथे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी आले असता संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी साईभक्तांना ई-रेल्वे तिकीट आरक्षणाबरोबरच दर्शन पासेस आरक्षित करण्याची सुविधा सुरू करण्याची मागणी केली होती. गोयल यांनी ही मागणी तत्काळ मान्य करून या संदर्भात आदेश दिले होते. यानुसार आता रेल्वेने प्रवास करणाऱ्या साईभक्तांना आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरुन तिकीट बुक करतानाच श्री साईंच्या दर्शनाचे पासेस आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे . यामुळे साईभक्तांच्या वेळेची बचत होऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन तत्काळ होणार आहे. २६ जानेवारीपासून ही सुविधा कार्यान्वित केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.