राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात अहमदाबादमध्ये भेट झाल्याचे वृत्त काल समोर आल्यापासून, राज्यातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना सुरूवात झाली आहे. अनेकांकडून तर विविध राजकीय अंदाज देखील वर्तवले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने जरी या भेटीबाबतचे वृत्त फेटाळले असले, तरी गृहमंत्री अमित शाह यांनी मात्र सर्वच गोष्टी सार्वजनिकपणे केल्या जात नाहीत, असं म्हणत यातील सस्पेन्स अधिकच वाढवला आहे. आता, या सर्व चर्चा व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“मी ठामपणे सांगतो अशी काही गुप्त भेट वगैरे अजिबात झालेली नाही. आता तरी रहस्य कथेचा शेवट करा. अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही. तसेच, काही गोष्टी वेळेबरोबर स्पष्ट झाल्या पाहिजे, नाहीतर भ्रम निर्माण होतो. मी विश्वासाने सांगू शकतो की, शरद पवार आणि अमित शाह यांच्यात अहमदाबाद किंवा कुठही गुप्त बैठक झालेली नाही. आता तरी अफवा संपवा, याने हाती काहीच लागणार नाही.” असं संजय राऊत यांनी बोलून दाखवलं आहे.

या अगोदर बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, “अमित शहा-पवार भेटीत फार काही राजकारण आहे असं मला अजिबात वाटत नाही. अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत. ते बऱ्याचशा भेटीगाठी अहमदाबादमध्ये देखील घेत असतात. शरद पवार देशातले महत्त्वाचे नेते आणि खासदार आहेत. जर भेटले जरी असतील, तरी त्यावर भुवया उंचावून हातभर जीभ बाहेर काढावी असं काय आहे? उलट देशात असा संवाद सतत व्हायला हवा. लोकशाहीचा तो फार मोठा अलंकार आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत हे होत होतं. अटल बिहारी वाजपेयींपर्यंत हे होत होतं. भिन्न विचारसरणीचे लोक राजकारणापलीकडे जाऊन भेटत होते, चर्चा करत होते, विचारविनिमय करत होते.”

तर, “अमित शहांनी खरंच गुप्त ठेवलं असतं काही तर ती भेट बाहेर कशी आली असती? राजकारणात गुप्त असं काहीही नसतं. गुप्त म्हणून आपण काही घडवायला गेलो, तर ते सगळ्यात आधी बाहेर पडतं.” असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत.

शरद पवार-अमित शाह भेट?; राष्ट्रवादी म्हणते नाही, शाह म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या . २६ मार्च रोजी अहमदाबादमधील एका फार्म हाऊसवर पवार-शाह यांची भेट झाल्याचं वृत्त एका गुजराती दैनिकाने दिलं. या वृत्तानंतर राज्यात या भेटीबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली आहे.