प्रशांत देशमुख

शहरातील मजूरवर्ग टाळेबंदीने गावाकडे परतला. हाताला काम हवे, मात्र शेतीशिवाय पर्याय नसल्याने हा स्थलांतरित मजूरवर्ग कामे शोधत आहे. याच पार्श्वभूमीवर या अतिरिक्त मनुष्यबळास सेंद्रिय शेती की रासायनिक शेती फायदेशीर ठरेल यावर खल सुरू झाला आहे.

सेंद्रिय शेतीसमर्थक ही शेती आठ महिने शेतीचे व चार महिने पूरक उद्योगाचे असल्याने फायदेशीर असल्याचा दावा करतात. या शेतीच्या आधारे निर्माण होणाऱ्या विविध छोटय़ा व्यवसायातून असंख्य रोजगार निर्माण होतात. संपूर्ण कुटुंबाला रोजगार मिळतो, असे सेंद्रिय शेतीसमर्थक आकाश नवघरे सांगतात. निरोगी व शांतीपूर्ण जीवन जगण्यासाठी ग्रामोद्योग आधारित बिनखर्चाची व बिनकर्जाची शेतीच उपयुक्त असल्याचे ते म्हणतात. रासायनिक शेतीने जमिनीची नापिकी, प्रक्रिया करणाऱ्या मजुरांना त्वचारोग, या कापसाची पेंड गुरांसाठी अपायकारक, अळीचे प्रभावी नियंत्रणसुद्धा नाही, रोजगार घटला व अन्य आपत्ती ओढवल्या. सेंद्रिय शेती निसर्गावर प्रेम करणारी व कुटुंबाचे आरोग्यदायी पोषण करणारी ठरली आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या गावातच रेचा, सूतकताई, विणकाम, सरकीपासून खाद्यतेल, काडीकचऱ्यापासून खते, असे उद्योग सुरू करीत आत्मनिर्भरता साध्य केली.

पर्यावरणपूरक शेती

छत्तीसगड शासनाने कृषी व ग्रामोद्योगाची सांगड घालत शहराकडे होणारे पलायन थांबविल्याचे सेंद्रिय शेतीसमर्थक निदर्शनास आणतात. गावाकडे आलेल्या मजुरांचे हाल झाले. आता त्यांना गावातच रोजगार हवा आहे. म्हणून मोठय़ा प्रमाणावर रोजगार निर्मिती आवश्यक आहे. गावातच कापसावर प्रक्रिया केल्यास विविध कामे उपलब्ध होतात. या कापसाची सरकी गावातच राहील. ती पशुखाद्य व तेलासाठी उपयुक्त ठरते. कापसाचे अधिक उत्पादन घेण्याच्या प्रयत्नात हे असे उद्योग नष्ट झाले. त्याला या निमित्ताने चालना देऊन रोजगार पुरविता येतील, असे गोपुरी येथील ग्रामसेवा मंडळाचे वसंत फुटाणे निदर्शनास आणतात. आचार्य विनोबा भावे यांनी स्थापन केलेल्या या मंडळामार्फत हातमाग, तेलघाणी व अन्य स्वरूपाचे उत्पादन आणि प्रशिक्षणसुद्धा या संस्थेतर्फे  दिले जाते. देशी कापसाच्या मोबदल्यात सेंद्रिय कापड देण्याची योजना ग्रामसेवा मंडळात राबविली जाते. याच देशी कापडाची मागणी या वेळी मुखपट्टय़ा तयार करण्यासाठी झाली. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कापसाला बाजारभावापेक्षा दहा ते वीस टक्के अधिक भाव ग्रामसेवा मंडळातर्फे  दिला जात असल्याचे फुटाणे सांगतात. या बियाण्यांचा २०१४ पासून बीजोत्सव आयोजित केला जातो. हजारो शेतकरी त्याचा लाभ घेत असल्याचे आयोजक आकाश नवघरे यांनी नमूद केले. चांगल्या आरोग्यासह असंख्य रोजगार निर्माण करणारी सेंद्रिय शेतीच यापुढे उपयुक्त ठरण्याचा असा दावा केला जातो.

अद्ययावत तंत्रज्ञान नाकारणे घातक  : सतीश दाणी

रासायनिक किंवा जनुकीय शेतीचे समर्थक अधिक उत्पादन देणाऱ्या बीटी वाणाचा पुरस्कार करतानाच अधिक रोजगार निर्मितीचा दावा करतात. मनाई असलेल्या या वाणाची लागवड करू देण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. या नव्या तंत्रज्ञानावर आधारित बियाण्यांची लागवड करण्याचे आंदोलनच संघटनेने सुरू केले आहे. आंदोलन करताना परतलेल्या मजुरांसाठी हीच शेती रोजगार देऊ शकत असल्याचा दावा करण्यात आला. शेतकऱ्यांना या जीएम तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य दिल्यास सोयाबिनचे हेक्टरी उत्पादन चाळीस क्विंटलपर्यंत वाढू शकते असा दावा केला जातो. जगातील विविध देशांत या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी संपन्न झाल्याचे दाखले आहेत. शेतकऱ्याला अद्ययावत तंत्रज्ञानाची गरज असताना ते नाकारण्याचा प्रकार घातक ठरेल, असे मत संघटनेच्या युवा आघाडीचे अध्यक्ष सतीश दाणी व्यक्त करतात. जनुकीय सुधारित बियाणे बोंडअळी प्रतिरोधक व अधिक उत्पन्न देणारे असल्याने देशातील साठ टक्के कार्यक्षम व्यक्तीला रोजगार उपलब्ध होऊ शकतो. जागतिक बाजारपेठेत भारतीय शेतकरी स्पर्धा करू शकतो. विविध उद्योगांच्या माध्यमातून शेतकरीच व्यापार करण्यास समर्थ होण्याचा दावा संघटना करीत आहे.

सेंद्रिय शेतीसमर्थक वसंत फुटाणे म्हणतात की कृषीसेवा केंद्राची गरज नाकारणारी सेंद्रिय शेती नवनिर्मितीच करणारी राहिली आहे. याच शेतीने फळशेती, वृक्षशेती, औषधी वनस्पती शेतीला प्रोत्साहन देत नवनवे रोजगार निर्माण केले. जमिनीची पोषकता व कर्जाचा भार हलका करण्यास समर्थ असणारी ही शेतीच गावातच प्रत्येकाला रोजगार देऊ शकते.

शेतकरी संघटनेच्या नेत्या श्रीमती सरोज काशीकर यांनी बीटी वाणाची शेती कामे संपविणारी नसून कामे निर्माण करणारी असल्याचा दावा केला. आज गावातील युवकांना कष्टाचे काम नको, तसेच त्याला चार क्षण विरंगुळय़ाचे मिळावे म्हणून फावला वेळसुद्धा हवा आहे. या शेतीने तण काढणाऱ्या महिलांचा रोजगार घटला असला तरी कापसाचे उत्पादन अधिक झाल्याने घरात चार पैसे अधिक येतात असे नमूद केले.