गेल्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान व शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रचारसभेत बुलडाणा जिल्हावासीयांना शेगाव-खामगाव-जालना रेल्वेमार्ग पूर्ण करू, या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी, अशी विनंती बुलडाणा जिल्हा रेल्वे लोकआंदोलन समितीने त्यांना व संबंधित मंत्री, खासदार, आमदार व अधिकाऱ्यांना केली आहे. त्याचवेळी समितीने जिल्ह्याचे खासदार व सत्ताधारी आमदारांनाही या आश्वासनाची पूर्तता करावी, अशी विनंती केली. या मागणीसाठी बुलडाणा अर्बन १०० कोटीची गुंतवणूक करण्यास तयार असल्याचे पत्रसुद्धा रेल्वे लोक आंदोलन समितीने सोबत सर्वाना पाठविले आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी व विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खामगावच्या सभेत याबद्दल जाहीर आश्वासन देऊन रेल्वेमार्गाला अनुकूलता दाखविली होती. त्यामुळे बुलडाणा व जालना जिल्ह्यातील जनता या आश्वासनाच्या पूर्ततेची वाट पाहत आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु हे पूर्वाश्रमींचे शिवसेनेचे व आता भाजपाचे आणि विशेष महाराष्ट्रातीलच आहेत. बुलडाणा रेल्वे लोकआंदोलन समिती गेल्या १० वर्षांपासून सातत्याने या रेल्वेमार्गाचा विषय विविध स्तरावर लावून धरत आहे. यासाठी आंदोलनेही केली आहे. मागील केंद्र व राज्य शासनाने जिल्ह्यावर केलेल्या भेदभावपूर्ण वागणुकीवर औरंगाबाद खंडपीठात ५० टक्के भागीदारीसाठी जनहित याचिका दाखल केलेली आहे. त्यात राज्य व केंद्र सरकारला न्यायालयाने नोटीसही पाठविल्या आहेत. या मार्गामुळे जिल्ह्यातील शेगाव-खामगाव-चिखली-सिंदखेडराजा ही गावे राष्ट्रीय रेल्वे मार्गावर येऊन देशाशी जोडली जातील. विदर्भाची पंढरी संतनगरी शेगांव, मातृतीर्थ सिंदखेडराजा, जगप्रसिध्द लोणार या पर्यटन व तीर्थक्षेत्राचा विकास, पश्चिम विदर्भ मराठवाडय़ाला जोडला जाणे, नागपूर-औरंगाबाद अंतर २५० कि.मी. कमी होऊन थेट जोडले जाणे, मुंबई, पुणे, औरंगाबाद, खामगाव, अकोला, अमरावती, नागपूर इंडस्ट्रियल कॅरिडॉरचा विकास इत्यादी गोष्टी साध्य केल्या जाऊ शकतात.
खामगाव-जालना रेल्वेमार्ग शेगावपर्यंत वाढवून तातडीने पूर्ण करणे व नागपूर-अमरावती सिटी लिंक एक्स्प्रेस व मुंबई-भुसावळ पॅसेंजर शेगांव हॉल्टिंग अॅट खामगावपर्यंत चालविण्यात यावी, असे निवेदन सर्व मान्यवर नेत्यांना रेल्वे लोकआंदोलन समितीने पाठविले आहे. या निवेदनावर समितीचे प्रा.किशोर वळसे, संतोष लाखंडे, संतोष अग्रवाल, रेणुकादास मुळे, भारत दानवे, अनुष महाजन व इतर सदस्यांच्या सह्या आहेत.