24 November 2017

News Flash

मनसेची नजर आता विदर्भावर

मराठीच्या मुद्यावर मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत वर्चस्व निर्माण करणाऱ्या महाराष्ट्र

प्रतिनिधी, नागपूर | Updated: March 13, 2013 3:58 AM

मराठीच्या मुद्यावर मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत वर्चस्व निर्माण करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन विदर्भात मात्र फारसे पुढे सरकू शकले नव्हते. त्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भावर लक्ष केंद्रित केले आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ठरलेली उपराजधानीतील त्यांची जाहीर सभा रद्द करून ती २४ मार्चला अमरावतीला घेण्याचे निश्चित झाले आहे.
गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या वेळी महाराष्ट्रात त्यातही विशेषत मुबंई, नाशिक आणि पुण्याला नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांनी मराठीच्या मुद्यावर मतदारांमध्ये जो विश्वास निर्माण केला होता, त्याचा फटका शिवसेना-भाजप युतीला बसला होता. लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे युतीचे अनेक उमेदवार पराभूत झाले होते. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत झाली. गेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात मनसेने निवडणूक लढविली नव्हती. मात्र विधानसभा निवडणुकीत १८ मतदारसंघांत उमेदवारांनी निवडणूक लढविली. त्यावेळी सिंदखेडराजा आणि राजुरा मतदारसंघवगळता एकाही ठिकाणी मनसेचा उमेदवार पाच हजारांच्या वर मते घेऊ शकला नव्हता. विदर्भात मनसेची ताकद वाढविण्यासाठी मधल्या काळात स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू ठेवले, मात्र त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी रणशिंग फुंकले असताना राज्यात ९ सभा घेण्याचे निश्चित केले होते. त्यातील चार सभा झाल्या असून त्याला अपूर्व असा प्रतिसाद मिळाल्यामुळे उपराजधानीत होणाऱ्या सभेकडे सर्वाचे लक्ष लागले होते. उरलेल्या पाच सभा शिल्लक असताना त्या पाचमधील पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार परभणी आणि नागपूरची सभा रद्द केल्याची माहिती मिळाली असून त्यास मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. नागपुरात मार्चच्या दुसऱ्या आठवडय़ात राज ठाकरे यांची सभा घेण्याचे निश्चित झाले होते. त्याप्रमाणे जिल्ह्य़ातील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते गेल्या दोन महिन्यापासून गावागावात जाऊन बैठकी घेणे, गावात सभेची जनजागृती करण्याचे काम करीत होते. मधल्या काळात मनसेचे आमदार राम कदम, शिशिर शिंदे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी पूर्व विदर्भातील काही जिल्ह्य़ात जाऊन कार्यकत्यार्ंच्या बैठकी घेऊन त्यांना सभेच्या संदर्भात सूचना केल्या होत्या. मनसेच्या विदर्भातील संपर्कप्रमुखासह काही पदाधिकारी उपराजधानीत जाहीर सभेच्या निमित्ताने ठाण मांडून बसले होते. सहा वर्षांनंतर राज ठाकरे यांच्या भाषणांचा झंझावात उपराजधानीला अनुभवता येणार होता. मात्र नव्या कार्यक्रमानुसार नागपूर आणि परभणीमधील त्यांच्या सभा रद्द करण्यात आल्यामुळे पदाधिकाऱ्यांसह राज ठाकरेप्रेमी नाराज झाले आहेत.
विदर्भात केवळ अमरावतीला सभा होणार असून अन्य काही जिल्ह्य़ांत केवळ कार्यकर्त्यांच्या बैठकी घेणार असल्याची माहिती मनसेचे पूर्व विदर्भ प्रमुख हेमंत गडकरी यांनी दिली. उपराजधानीत मनसे आता पाय रोवत असताना सभा रद्द झाल्यानंतर मनसेच्या अनेक कार्यकत्यार्ंनी नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी नागपुरातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांचे राजकीय संबंध पाहता आगामी लोकसभा निवडणुकीत पूर्व विदर्भात गडकरी यांच्या प्रतिष्ठेला कुठलाही धक्का बसू नये याची काळजी राज ठाकरे यांनी घेतली असावी, दरम्यान, महायुतीमध्ये मनसे सहभागी होणार असल्याच्या चर्चेमुळे राजकारणात बरेच बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

First Published on March 13, 2013 3:58 am

Web Title: now mns target is vidharbha
टॅग Mns,Political,Vidharbha