शिर्डी लोकसभा मतदारसंघातील प्रचारात आता रंग भरला आहे. उमेदवार व नेते एकमेकांवर व्यक्तिगत चारित्र्यहननाचे आरोप करू लागले आहेत. त्यात आता राज्यातील नेतेही उतरले आहेत. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात विरोधकांकडून माजी खासदार बाळासाहेब विखे व कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांना लक्ष्य करण्यात आले आहे.
काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पहिल्यांदा युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यावर ते डान्स बार चालवतात, मुंबईला राहतात, निवडणूक संपली की मुंबईला जातील असे आरोप केले. लोखंडे यांनी मी पहिल्यांदा जिल्हा परिषद व विधानसभेत पराभूत झालो होतो. पण मुंबईला गेलो नाही. मग जनतेने १५ वर्षे आमदार केले असा खुलासा करत आरोप खोडून काढले. विखे यांनी लोखंडे यांच्यावर डान्स बारचे आरोप केले. लोखंडे यांनी विखे यांना सडेतोड उत्तर दिले. मी दिघोळचा आहे. मग मी बाहेरचा कसा, तुम्हाला सोनिया गांधी चालतात, तर मी का चालत नाही, असा आरोप करत विखे यांच्या उपरा उमेदवार या टीकेला उत्तर दिले. माझे एकच बि-हाड आहे. तुमचे रात्रीचे धंदे सांगितले तर पळता भुई थोडी होईल, अशी बोचरी टीका लोखंडे यांनी केली.
शिवसेनेचे कार्याध्यक्ष ठाकरे यांनीही विखे वगळता राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या अन्य मंत्र्यांवर व नेत्यांवर टीका केली नाही. अजित पवार व विखे दोघांनीही ठाकरे यांच्यावर तिकिटे विकल्याचा आरोप केला होता. पण ठाकरे यांनी विखेंनाच लक्ष्य केले. विखे यांची निम्मी हयात काँग्रेसमध्ये गेली. त्यांना कच-याच्या डब्यात फेकले होते. अडगळीत पडलेल्या या पिता-पुत्रांना सेनाप्रमुखांनी मंत्री केले. खाल्ल्या मिठाला ते जागले नाही. मुळा-प्रवरेत भ्रष्टाचार करून त्यांनी शेतकरी व सभासदांना वाऱ्यावर सोडले. कमविलेला काळा पैसा कुठे गेला, असा सवालही ठाकरे यांनी केला.
खासदार वाकचौरे यांच्या सभेत शिवसैनिक गोंधळ घालत होते. काही ठिकाणी अंडी फेकण्यात आली. त्याचा समाचार विखे यांनी घेताना आम्हालाही या मार्गाने जाता येते. पण आमची संस्कृती नाही. पण आमच्या नादी लागले तर तुमच्याच झेंडय़ांच्या काठय़ा उलटय़ा करून झोडपून काढू, असा इशारा त्यांनी दिला होता. विखे यांच्या इशा-याचा उल्लेख करत ठाकरे यांनी आम्ही कुणाच्या अंगावर जाणार नाही. पण तुम्ही आला तर जागच्या जागी ठेचू असा इशारा दिला. विखे यांनी लोखंडे यांचा पाणीप्रश्नाचा अभ्यास नाही, असाही आरोप केला होता.
विखे यांनीही ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. आपल्या घरच्या भाऊबंदकीचा वाद आधी मिटवा, मग महाराष्ट्राच्या प्रश्नांची चिंता करा. केवळ निवडणुकीत येऊन सभेत टीका करायची. टाळ्या मिळवायच्या म्हणून चिडून जाऊन भाषणे करायची. त्याने काही होणार नाही. शिवसेनेला अखेरची घरघर लागली आहे, अशी टीका विखे यांनी ठाकरे यांच्यावर केली. मतदारसंघात प्रचाराच्या अंतिम टप्प्यात वाकचौरे व लोखंडे हे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत, पण त्यात आता विखेही उतरले आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, राष्ट्रवादीचे नेते व मंत्री मधुकर पिचड, शंकरराव कोल्हे, प्रसाद तनपुरे, आमदार भाऊसाहेब कांबळे, शंकर गडाख हे मात्र राजकीय चिखलफेकीपासून दर आहेत.
वाकचौरे यांच्या सभेत शिवसैनिकांनी यापूर्वी गोंधळ घातला. पण ठाकरे यांच्या सभेतही काही रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काही काळ गोंधळ घातला. व्यासपीठावर डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला हार घातला नाही, असा गैरसमज झाल्याने दलित कार्यकर्ते घोषणाबाजी करत होते. पण त्यांना वस्तुस्थिती दाखवून देण्यात आली. व्यासपीठावर शिवाजी महाराज, सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला तसेच महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला होता. गैरसमज दूर झाल्यानंतर त्यांची घोषणाबाजी थांबली. पण ठाकरेंच्या सभेलाही गोंधळाला सामोरे जावे लागले.