कोल्हापुरात शाहू मिलच्या जागेवरच छत्रपती शाहू महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याच्या प्रस्तावास तत्वत: मान्यता देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधानसभेत करून या विषयावरून निर्माण झालेल्या वादावर पडदा पाडला. या स्मारकाचा आराखडा तयार करण्यासाठी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून तिचा अहवाल प्राप्त झाल्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
शाहू मिलच्या जागेवर ‘गारमेंट पार्क’ उभारण्याचा वस्त्रोद्योग विभागाचा प्रस्ताव होता. त्यासाठी निविदाही काढण्यात आल्या होता. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी दादरमध्ये इंदू मिलची जादा देण्याचा निर्णय होताच शाहू महाराजांचे स्मारक शाहू मिलमध्ये उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आमदार के. पी. पाटील यांनी  सोमवारी ही मागणी सभागृहात करताच त्याला सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला. शाहू महाराजांनी राज्य आणि देशासाठी मोठे योगदान दिले आहे. शाहू मिलसाठी जमीन त्यांनीच दिली होती.